अडीच कोटींचं आमिष देवून पाच लाखांचा गंडा, पिंपात निघाली झेंडूची फुलं
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिलीय. देवळी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.
वर्धा : पाच लाख रुपयांचे अडीच कोटी रुपये मिळण्याचं आमिष दाखवून वर्ध्याच्या तळेगाव (टालाटुले) इथल्या शेतकर्याची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शेतकर्यानं पिंप उघडून बघितले असता, त्यात झेंडुची फुलं मिळालीत. याप्रकरणी देवळी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा नोंद केला असून तीन जणांना अटक केली आहे.
सोयाबीन विकून पाच लाख रुपये दिले
तळेगाव (टालाटुले) इथल्या मधुकर खेलकर नामक शेतकर्याला तीन ओळखीच्या इसमांनी एका महाराजाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचे अडीच कोटी रुपये बनवून देण्याचं आमिष दाखवलं. या आमिषाला बळी पडून शेतकरी मधुकर खेलकर यांनी सोयाबीन विकून पाच लाख रुपये आणले. ते पैसे घेऊन या तीन जणांनी शेतकऱ्याला मसाळा शिवारात नेलं. तेथे लक्ष्मण नावाच्या इसमानं शेतकऱ्याला अनोळखी महाराजाकडे नेलं. तेथे खेलकर यांचे पाच लाख रुपये महाराजाला देण्यात आले. महाराजांनी ते पैसे स्टिलच्या पिंपात टाकून कुलूप लावलं. त्याचे अडीच कोटी रुपये होतील, असं सांगत पिंपाला लॉक लावून घरी घेऊन जावून बघण्यास सांगितलं. यावेळी फॉरेस्टवाले आले म्हणत महाराजासह इतरांनी तेथून पळ काढला. पैसे असलेला पिंप खेलकर घेऊन गेले. कालांतराने पिंप उघडून बघितला असता त्यात त्यांना झेंडुची फुलं दिसली.
तिघांना पोलिसांनी केली अटक
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिलीय. देवळी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. खेलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनोळखी महाराज, लक्ष्मण नावाचा इसम, अशोक भाऊराव चौधरी (59) रा. वायगाव, ज्ञानेश्वर यादवराव हिंगे (59) व अक्षय ज्ञानेश्वर हिंगे (26) रा. आठवडी बाजार, देवळी या पाच व्यक्तींनी मधुकर खेलकर यांना तुमच्याकडे असलेले 5 लाख रुपयांचे अडीच कोटी आमच्या ओळखीचे महाराज यांच्यामार्फत करून देतो, असे सांगितले. पोलीसांनी तिघांना अटक केली आहे तर मुख्य आरोपी आणि एकाचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (Fraud of Rs 5 lakh from a farmer by paying a lure of Rs 2.5 crore)
इतर बातम्या
केडीएमसीच्या माजी स्थायी समिती सभापतीला तीन दिवसाची पोलीस कोठडी
Pune crime | घटस्फोटास नकार दिल्याने रागवलेल्या पतीने बुक्कीत पाडला पत्नीचा दात