वर्धा : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील (Ashti Taluka) पांढुर्णा परिसरामध्ये नागपूरच्या पारडी येथील पती-पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ निर्माण झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारडी येथील रहिवासी रामकृष्ण खडतकर (वय 60) व त्यांची पत्नी शोभा रामकृष्ण खतकर (वय 53) यांनी पांढुर्णा परिसरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. 27 जुलैपासून हे दाम्पत्य एमएच 49 एटी 5796 क्रमांकाचे व्यावसायिक वाहन घेऊन भ्रमंती करत होते. शनिवारी 6 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पांढुर्णा परिसरात रामकृष्ण खडतकर (Ramakrishna Khatkar) आणि शोभा खडतकर (Shobha Khatkar) यांचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविण्यात आले. घटनास्थळावरून विषारी द्रव्याचे ग्लास, बॉटल, पिशवी आदी साहित्य जप्त करण्यात आले.
घटनेनंतर पोलिसांनी मिळालेल्या मोबाईल क्रमांकावरून मृतकाच्या मुलाशी संपर्क साधला. मृतक हे मूळचे पारडी नागपूर शहर येथील असल्याची माहिती मिळाली. ते गावोगावी जावून बाजाराच्या ठिकाणी चप्पल, बुट विक्रीचा व्यवसाय करायचे. 27 जुलै रोजी ते एमएमच 49 ए टी 5796 क्रमांकाच्या वाहनात चप्पल बुट विक्रीसाठी घेऊन गेले होते. तेव्हापासून ते घरी परतले नव्हते. त्यांच्या मुलाने याबाबत नागपूर शहर पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार केली होती.
खडतकर दाम्पत्य 27 जुलैला घरून गेले. सोबत चप्पल विक्रीचे सामान होते. नेहमीप्रमाणे ते व्यवसायासाठी बाहेर गेले. पण, ते परत आलेच नाही. त्यामुळं त्यांच्या मुलानं नागपूर शहर पोलिसांत मिसिंगची तक्रार नोंदविली होती. आज या दाम्पत्यांच्या मृतदेह सापडला. त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी साहित्य जप्त केले आहे. तपासानंतर त्यांनी जीवन का संपविले याचा शोध घेतला जाईल. मृतकाच्या मुलाकडूनही माहिती घेतली जाईल. त्यानंतर जीवन का संपविले याचं कारण पुढं येण्याची शक्यता आहे.