वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मिशन विदर्भ सुरू करण्यात आले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे हिंगणघाट येथे संघटनात्मक आढावा दौऱ्यानिमित्त आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट (Hinganghat) शहरात भव्य रॅली काढण्यात आली. कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा (worker meeting) घेण्यात आला. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती सर्वात जास्त होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते 750 कार्यकर्त्यांचा (activists joined) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यात आला.
हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे मतदार संघातील तरुणाईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रचंड विश्वास आहे. याची अनुभूती आज तरुणांची गर्दी पाहून आली असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केले. हा तरुण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मोठ्या आशेने पाहत आहे. आपण त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. सर्व गटतट विसरून आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. आपण एकत्र आलो तर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस हमखास जिंकेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारशी संघर्ष करायचा असेल तर कार्यकर्त्यांची मोठी फौज आपल्याला लागेल. त्यासाठी सभासद नोंदणी तात्काळ पूर्ण करा, असं जयंत पाटील म्हणाले. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने, तरुणांच्या ताकदीने हा भाग आपण पुन्हा राष्ट्रवादीमय करू, असेही आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, माजी आमदार सुरेश देशमुख, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ ताकसांळे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले, माजी आमदार राजू तिमांडे, प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ॲड. सुधीर कोठारी, माजी नगर सेवक प्रलय तेलंग, ज्येष्ठ नेते राजेंद्र डागा, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष हरीष काळे, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष जितेंद्र सेजवल, विधानसभा अध्यक्ष संजय तपासे, तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे, सुरेखाताई देशमुख, शहराध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, महिला शहराध्यक्ष मृणाल रिठे, हिम्मत चतूर, प्रशांत घवघवे, दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, अल्ताफ खान आदी उपस्थित होते.