वर्धा : आई मी खेळायला जातो असे सांगून घरातून गेलेले दोन्ही मित्र संध्याकाळी घरी परतलेच नाही. मात्र दुसऱ्या दिवशी दोघांचे विहिरीत मृतदेह आढळले. या घटनेमुळं आर्वी शहरात (Arvi City) खळबळ माजली. खेळण्याच्या बहाण्याने निघालेले युवक विहिरीत पोहायला गेले. तेथे बुडून या दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी अन्त झाला. आर्वी जवळील शहापूर शिवारात (Shahapur Shivar) सकाळदरम्यान पाण्याकरिता गेलेल्या मजुराला मृतदेह तरंगत दिसला. रात्री मुले घरी परत न आल्याने कुटुंबियांनी आर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली. देवांश नीलेश घोडमारे (Devansh Ghodmare) राहणार आसोलेनगर, आर्वी (वय 14 वर्ष ), युगंदार धर्मपाल मानकर, रा. साईनगर (वय 15 वर्ष ) अशी मृतकांची नाव आहे. हे आर्वी येथील तपस्या इंग्लिश शाळेत नवव्या वर्गात शिकत होते. दोघेही चांगले मित्र होते. देवांश घोडमारे हा शनिवारी पाच वाजतादरम्यान आपल्या आईला क्रीडासंकुल मैदानात खेळायला जातो असं सांगून गेला. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत न आल्याने त्याची शोधाशोध सुरु झाली.
दुसरीकडे युगंदार मानकर हा सुद्धा घरी परत आला नव्हता. दोन्ही मित्र कुठे गेले याबाबत सगळीकडे विचारणा करूनही न आढळले नाही. त्यामुळं आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी तांत्रिक दृष्ट्या तपास करत रात्रभर दोघांचा शोध घेतला. पण कुठेही त्यांचा थांगपत्ता लागला नाही. आज सकाळच्या सुमारास माटोडा बेनोडा मार्गांवर शहापूर शिवारात राजेश गुल्हाने यांच्या शेतात शेतमजूर कामाला होते. मजूर पाणी पिण्याकरिता शेतातील विहिरीवर गेले. त्यांना एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. दुसरा विहिरीच्या गाळात अडकलं होता. लागलीच पोलिसांनी माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह बाहेर काढले. ते मृतदेह या दोन्ही चिमुकल्यांचे असल्याच समोर आलंय. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्वी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.
ही दोन्ही मु्ले मागील काही दिवसांपासून याच शेतात असलेल्या विहिरीवर पोहायला जात होते. मात्र या बाबत घरच्यांना कोणतीच माहिती नव्हती. विहिरीत दोराला उतरवून हे विहिरीत उतरायचे आणि पोहायचे. वाढत्या तापमानामुळे विहिरीचे पाणी आटले होते. यामुळे मुलांना दोर कमी पडला. करिता दोर वाढविण्यासाठी त्यांनी पट्टीचा दोर त्याला बांधून दोर मोठे केले. विहिरीत उतरल्यावर हा दोर युगंदारच्या हाताला गुंडाळल्या गेला. यामुळे त्याला पोहता आले नाही आणि तो बुडायला लागला. मित्राला वाचविण्यासाठी देवांशने धडपड केली. मात्र तो सुद्धा पाण्यात बुडला असावा. घटनेच्या तब्बल पंधरा तासांनी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. दोघांचे कपडे, चप्पल आणि सायकल हे पोलिसांना विहिरीच्या बाहेर आढळले आहे.