Wardha Flood : पवनूर गावात लोकप्रतिनिधींनी केली पाहणी, खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे अधिकाऱ्यांसह दाखल
बंधारा फुटल्याने गावात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात गावातील शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. एक गुराखीसुद्धा वाहून गेला आहे.
वर्धा : वर्धा तालुक्याच्या पवनूर (Pawanur) येथील वन विभागाचा वनराई बंधारा (Vanrai Bandhara) मंगळवारी वाहून गेल्याने गावात पाणी शिरले होते. सतत सुरु असलेल्या पावसामुळे आणी नाल्याला आलेल्या पुरामुळे पवनूर, खानापूर आणी कामठी (Kamathi) या गावातील घरात पाणी शिरले होते. गावात झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच बुधवारी सकाळी अधिकाऱ्यांसह खासदार रामदास तडस आणि आमदार रणजित कांबळे यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. पवनूर येथे पाच वर्षांपूर्वी बंधाऱ्याचे खोलीकरण करत वनविभागाकडून वनराई बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाऱ्याचे सिमेंटीकरण झाले नाही. काल आलेल्या पावसात हा बंधारा फुटला. खासदार, आमदार घटनास्थळी दाखल झाल्यामुळं प्रशासनही जोमाने कामाला लागले आहे. पण, पावसापुढं कुणाचं चालत नाही, असं म्हणतात. अशी काहीसी परिस्थिती या पावसामुळं झाली आहे.
नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश
बंधारा फुटल्याने गावात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात गावातील शेतीपिकांचेही नुकसान झाले आहे. एक गुराखीसुद्धा वाहून गेला आहे. गावात झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करत तत्काळ मदत मिळावी, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याची माहिती गावात पाहणी करण्यासाठी पोहचलेल्या खासदार रामदास तडस आणि आमदार रणजित कांबळे या दोन्ही लोकप्रतिनिधींनी दिलीय. गावात पाहणी करून लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायतीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. वर्धेचे उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी वर्धा यांच्यासह पवनूर, खानापूर, कामठी आणि मजरा या गावातील नागरिकसुद्धा यावेळी उपस्थित होते. उपमुख्यकार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, ग्रामसेवक सुद्धा उपस्थित होते.
अजूनही पावसाचा जोर कायम
पवनूर येथील 35 घरांत पाणी शिरले. खानापूर तसेच कामठी येथील 14 घरांत पुराचे पाणी शिरल्याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली. आंजी-पवनूर मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. प्रशासनानं नागरिकांना मदतकार्य सुरू केली आहे. अजूनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं पूरपरिस्थितीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हिंगणघाट-येनोरा मार्ग तसेच समुद्रपूर वर्धा मार्ग वाहतुकीसाठी बंद झालाय. सेलू तालुक्यातील संतोष आडे हा व्यक्ती वाहून गेला.