वर्धा : महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्रीच्या अंधारात लुटायचे आणि हात मारला की आपल्या परिवारासोबत देवदर्शनाला जायचे, अशी गुन्ह्याची पद्धत असलेल्या दरोडेखोरांनी जिल्ह्यात सलग दोन दिवस दोन ठिकाणी मोठा हात मारला. त्यानंतर नवरात्र असल्याने माहूर गडावर दर्शनासाठी निघून गेले. परंतु पोलिसांच्या ‘मास्टर माईंड’ समोर दरोडेखोरांची युक्ती फसली. पोलिसांनी जीव धोक्यात टाकून अवघ्या 15 तासांत गुन्हाचा तपास पूर्ण करीत 9 जणांच्या टोळी (Gang)ला माहूर गडावरुन अटक (Arrest) केली. बबलू अप्पा शिंदे (28), अमोल आप्पा शिंदे (32), महादेव अंन्सार काळे (24), उत्तम सुंदर शिंदे (50), दत्ता सुंदर शिंदे (35) व विकास संजय शिंदे (21), सुनील लहू काळे (22 ), सर्जेराव तात्याजी शिंदे (25), लहू राजेंद्र काळे (45) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Police have arrested a gang in connection with a burglary on a highway in Wardha)
या टोळीने 6 एप्रिल रोजी तळेगाव पोलीस ठाण्यांतर्गत नागपूर-अमरावती महामार्गावर पहाटेच्या सुमारास भंडारा येथील उरकुडे परिवाराला मारहाण करुन त्यांच्याकडून 1 लाख 78 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटला. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नागपूर-वणी मार्गावरील समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वणी येथील खान परिवाराला मारहाण करुन त्यांच्याकडून 64 हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. या दोन्ही घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती. याप्रकरणी तळेगाव व समुद्रपूर पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला गती दिली.
समुद्रपूर पोलिसांच्या हद्दीतील महामार्गावर 7 मार्चला पहाटे 2.45 वाजता वाहनचाकाला लुटल्याची माहिती मिळताच सकाळी 6 वाजता स्थानिक गुन्हे शाखेची चमू घटनास्थळी दाखल झाली. चौकशी सुरु असतानाच जाम चौरस्त्यावर दोन संशयित वाहने दिसल्याची माहिती मिळाली. त्या दिशेने तपासचक्र फिरविले असता वणानदीच्या खालच्या पुलावरुन ती दोन्ही वाहने वर्धेच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली. वर्ध्यात आल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देवळीकडे गेल्याची माहिती मिळाली. दुपारी 12 वाजता ती दोन्ही वाहने भिडीच्या टोलनाक्यावरुन गेल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोन्ही वाहनांचा सलग 12 तास पाठलाग करुन माहूर गड गाठला. तर ती वाहने तेथील पार्किंगमध्ये दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले.
उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप व स्थागिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वात जवळपास 15 पथके आरोपीच्या मागावर माहूर गडावर जाऊन पोहोचले. आरोपींची दोन्ही वाहने जिथे होती तेथील पार्किंगमध्ये पोलिसांनी आपली वाहने उभी करुन आरोपींची दोन ते तीन तास प्रतीक्षा केली. यादरम्यान वेशांतर करुन असलेल्या पोलिसांपैकी काही तेथे हार, फुले, चहा विकली तर काहींनी देवदर्शन घेतले. आरोपी देवदर्शनावरुन वाहनकडे येताच त्यांच्यावर झडप टाकून जेरबंद केले.
पोलिसांनी अगदी फिल्मीस्टाईनले माहूर गडावर सापळा रचला होता. आरोपी परिवारासह दर्शन घेवून वाहनाकडे येताच पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीतांनीच ‘चोर….चोर….’ अशी बोंब ठोकल्याने स्थानिक दुकानदारही आरोपींच्या मदतीला धावून आले. पण, लागलीच वर्दीतील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतल्याने दुकानदार मागे हटले. आरोपींसह त्यांच्या परिवारातील सदस्यांची सख्या जास्त असल्याने त्यांनी पोलिसांवर चांगलाच हल्ला केला. यात काही महिलांनीही पोलिसांना घेरले होते. या झटापटीत उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप व कर्मचारी राकेश आष्टणकर यांना किरकोळ दुखापत झाली.
महामार्गावर लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. 9 आरोपींना माहूरगडावरुन अटक करुन त्यांच्याकडून एम.एच.25 आर. 3927 व एम.एच.13 ए.सी.8082 क्रमांकाची वाहने जप्त केली. यासह वाहनातील सोने-चांदिचे दागिने, मोबाईल, रोख असा एकूण 24 लाख 69 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींनी वर्धा आणि धुळे जिल्ह्यातील गुन्हाची कबुली दिली असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपासकरीता आरोपींना समुद्रपूर पोलिसांच्या स्वाधिन गेले असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Police have arrested a gang in connection with a burglary on a highway in Wardha)
इतर बातम्या
Kalyan Crime : लोकल ट्रेनमध्ये चोरी करणाऱ्या चोरटीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या