वर्ध्यातून भाजपाने रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. रामदास तडस हे तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. मात्र, त्याआधी रामदास तडस यांना धक्का बसला आहे. रामदास तडस यांची सून पूजा तडस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “कारवाई टाळण्यासाठी म्हणून रामदास तडस यांच्या मुलाने पूजा तडसशी विवाह केला. पुढे त्या मुलीच काय झालं? मोदीच्या उमेदवाराने, मोदीजींचा परिवार संभाळला का? कारवाईच्या भीतीने फक्त लग्न केलं. पत्नीला फ्लॅटवर नेऊन ठेवलं. पुढे तिची काय अवस्था झाली, ते पाहिलं नाही. तो फ्लॅट विकला, तिला बाहेर काढलं” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.
सुषमा अंधारे यांनी नगर-वर्धा परिषदेतल लग्नाच प्रमाणपत्र सुद्धा दाखवलं. “लग्न करुन जे आपला परिवार सोडून देतात, ते मोदी का परिवार म्हणून हॅशटॅग लावतात, हे फार चमत्कारिक, भयंकर आहे. देवाभाऊंच्या हद्दीत अशा घटना घडाव्यात हे विशेष” अशा शब्दात सुषमा अंधारे यांनी टीका केली. “पूजा तडसला ज्या घरात ठेवलं होतं, ते विकलं. न्याय मागण्यासाठी तडस यांच्या जनसंपर्क कार्यालयात महिला गेली, तिथेही अपमान केला. ओढून बाहेर काढण्यात आलं” असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. “मोदींचा परिवार म्हणता आणि हा परिवार उद्धवस्त होतो. हा कसला मोदींचा परिवार?” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
‘उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला’
“स्वत:च्या मुलाला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी माझ्याशी लग्न लावून दिलं. मला फ्लॅटवर नेऊन टाकलं. उपभोगण्याची वस्तू म्हणून माझा तिथे वापर झाला. त्यातून या बाळाचा जन्म झाला. बाळा जन्मल्यानंतर डीएनए कर म्हणून आरोप झाले” असं दु:ख पूजा तडस यांनी मांडलं. “खासदार म्हणतात डीएनए टेस्ट कर, तेव्हा समाजातल्या माझ्यासारख्या मुलींनी जायच कुठे? प्रत्येकवेळी अपमानास्पद वागणूक दिली. घरी गेली, तेव्हा लोखंडी रॉडने मारहाण केली. फ्लॅट विकला. मुलाला बेदखल केलं म्हणता, मग त्याला घरात का ठेवलय?” असा सवाल पूजा तडसने केला.
‘मी तुमच्या परिवारातील लेक’
“महिलांना 33 टक्के आरक्षण देता. महिला सक्षमीकरणाबद्दल बोलता. मग मला न्याय का नाही मिळत?. पंतप्रधान मोदी 20 तारखेला सभेसाठी येणार आहेत. मी तुमच्या परिवारातील लेक आहे, न्याय मागते. मी तुमच्या परिवाराची हिस्सा असेन, तर मला, माझ्या बाळाला न्याय द्या. हा माझ्या स्वाभिमानाचा, अस्तित्वाचा प्रश्न आहे” अशी मागणी पूजा तडस यांनी पंतप्रधानांकडे केली.
‘तेव्हा लोक घाणेरडया नजरेने माझ्याकडे बघतात’
“मी समाजात जाते, तेव्हा लोक घाणेरडया नजरेने माझ्याकडे बघतात. कुठे चुकतय ते सांगा. मी डीएनए करायला तयार आहे. माझा अपमान करता, दोनवेळच अन्न सुद्धा देत नाही. माझा दोष काय आहे ते सांगा. जर लोकप्रतिनिधी सूनेला न्याय देऊ शकत नसेल, तर समाजाला काय देणार?” अशा शब्दात पूजा तडसने आपला संताप व्यक्त केला.