वर्धा : तुमच्या घरी जीन आहेत. घरी खड्डे खणून ठेवा. पूजा तंत्रमंत्र उच्चारून बंदोबस्त करून देतो, असे म्हणत भोंदू बाबाने मुलाच्या वडिलास पूजेचे साहित्य आणायला पाठविलं. शनिवारी हा विधी करू असे म्हणत मुलाला आर्वीला घेऊन गेले. दुस-या दिवशी फोन खणखणला आणि बाबानं मुलगा गेल्याचं सांगितलं. वारंवार विचारून बाबा मात्र घटना कशी घडली ते सांगतच नव्हता. पाहणी केली असता मुलाच्या गळ्यावर जखमा दिसून आल्यात. तंत्रमंत्रांनी उपचार करायला गेले अन् भोंदूबाबानं मुलाचा जीव घेतला. मृताचं नाव रितीक गणेश सोनकुसरे (Hrithik Sonkusare) असं आहे. आरोपींची नावं अब्दुल रहीम अब्दुल मजीद, अब्दुल जुनैद अब्दुल रहिम, अब्दुल जमीर अब्दुल रहिम सगळे राहणार विठ्ठल वॉर्ड अशी आहेत. मृताचे वडील गणेश तुकाराम सोनकुसरे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. अमरावती येथील रहिवासी गणेश सोनकुसरे यांचा मुलगा रितीक सोनकुसरे याची प्रकृती व्यवस्थित नव्हती. त्याला अमरावतीच्या रुग्णालयात (Amravati Hospital) दाखल करण्यात आलं. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, आर्वीच्या बाबाचा मोबाईल नंबर मिळाला आणि त्यावर संपर्क केला. बाबानं त्यांना आर्वीला (Arvi ) बोलावलं.
आर्वीला आल्यानंतर मुलाच्या त्रासाबद्दल माहिती दिली. बाबानं लिंबू, धागा दिला. त्यावेळी बाबानं पैसेही घेतलेत. पूजापाठ करत बाबानं आठ दिवसांनी बोलावलं. मध्यंतरी मुलाला अस्वस्थ वाटल्यानं बाबाला सांगितलं असता पुन्हा आर्वीला बोलावलं. तेथे पूजापाठ केला. मात्र पुन्हा मुलाला त्रास झाला. त्यानंतर बाबा अब्दुल रहिम यानं अमरावतीला जावून घराची पाहणी करत घराची तपासणी करत तंत्रमंत्र उच्चारत पूजा केली. त्यानंतर मुलाला घेऊन बाबा त्याच्या दोन मुलांसह घेऊन आर्वीला गेला. रात्री मुलानं प्रकृती अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं. सकाळी बाबानं मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. विचारणा करूनही बाबानं मृत्यूचं कारण सांगितलं नाही. मुलाच्या गळ्यावर जखमा दिसून आल्यात. मुलाच्या उपचाराच्या बहाण्यानं संगनमत करून खून केला. अशी माहिती उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे यांनी दिली.
या प्रकरणी आर्वी पोलिसांनी बाबासह त्याच्या दोन्ही मुलावर कलम नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केलीय. कायदा करूनही तंत्रमंत्रांवर विश्वास ठेवून अनिष्ठ प्रकारांना बळी पडण्याचे प्रकार नवे नाहीत. त्यात आर्वीत युवकाची चक्क हत्याच केली गेली. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या ख-या पण, असे प्रकार थांबवण्यासाठी जनजागृती तितकीच गरजेची आहे.
आर्वी येथे घडलेल्या या घटनेची व परिसरातील बाबा, मांत्रिकांची वरिष्ठ पोलीस अधिका-यां द्वारे सखोल चौकशी करून कारवाई होणे गरजेचे आहे. त्यातून आनखी धक्कादायक माहिती बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिस प्रशासनाला अ. भा. अंनिस नेहमीप्रमाणे संपूर्ण मदत करेल. जादुटोणा विरोधी कायद्याचा प्रचार व पोलिसांद्वारे कडक अंमलबजावणी करणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक प्रत्येक स्तरावरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत होणे गरजेचे आहे. तेव्हाच भविष्यातील अंधश्रध्दांचे बळी आपण थांबवू शकू. असं मत अ. भा.अंनिस- युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे यांनी सांगितलं.