Wardha Flood : पवनूर गावाजवळील वनराई बंधारा फुटला, सेलूत एक व्यक्ती वाहून गेला, विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम
सखल भागात असणारे गाव किंवा नदी नाल्यांच्या काठावर असलेल्या गावांनी सतर्क राहून आपलं स्थलांतर शक्य असल्यास करावं, अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत.
वर्धा : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. अश्यातच नदी नाले दुभडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्धा तालुक्याच्या पवनूर येथे सतत सुरु असलेल्या पावसामुळे वन विभागाचा वनराई बंधारा फुटलाय. सोबतच येथील नाल्याला पूर आलाय. नाल्याला पूर आल्याने पवनूर, खानापूर आणी कामठी या गावात पाणी शिरले. येथील नागरिकांना स्थानांतरित (Moved) करण्यात आले आहे. पवनूर येथील नागरिकांची तेथीलच असलेल्या मंदिरात (In Temple) व्यवस्था करण्यात आली. प्रशासनाकडून (Administration) उपाययोजना करण्यात येत आहेत. सेलू तालुक्यात संतोष आडे नावाचा व्यक्ती वाहून गेला. विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. हवामान विभागानं विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुरामुळे आंजी-पवनूर मार्ग बंद
पवनूर येथील तीस ते पसतीस घरांमध्ये पाणी शिरले आहे. खानापूर येथील सहा आणि कामठी येथील आठ घरांमध्ये पाणी शिरल्याची प्राथमिक माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली आहे. नाल्याला आलेल्या पुरामुळे आंजी पवनूर मार्ग हा पूर्णपणे बंद झाला आहे. गावात पाणी शिरल्याची माहिती मिळताच महसूल प्रशासनसह पोलिसांनी घटनास्थळी येथील नागरिकांना मदत केलीय. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पाणी पातळीत आणखी वाढ होत आहे.
पुराच्या प्रवाहात संतोष वाहून गेला
मागील चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. नाल्याना आलेल्या पुरामुळे हिंगणघाट-येनोरा मार्ग आणि समुद्रपूर-वर्धा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सेलू तालुक्याच्या सालई पेवठ येथे शेतशिवारातून पुराच्या प्रवाहात संतोष उत्तम आडे हा इसम वाहून गेलाय. अद्याप याचा शोध लागला नसून सकाळी पुन्हा प्रशासनाकडून शोध मोहीम राबवली जाणार आहे.
विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा मुक्काम
विदर्भात 24 तास मुसळधार पावसाचा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील चार दिवससुद्धा विदर्भात चांगला पाऊस राहील असाही अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवलेला आहे. बंगालच्या खाडीमध्ये आणखी एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे पुढील चार दिवस विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. सध्या विदर्भात जोरदार पाऊस असल्याने अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामान विभागाकडून नागरिकांनासुद्धा आवाहन करण्यात आलं. सखल भागात असणारे गाव किंवा नदी नाल्यांच्या काठावर असलेल्या गावांनी सतर्क राहून आपलं स्थलांतर शक्य असल्यास करावं, अशा सूचना सुद्धा करण्यात आल्या आहेत.