Wardha Crime | वर्धा प्रशासन अलर्ट मोडवर, 320 सराईत गुन्हेगार 7 दिवसांसाठी हद्दपार; शांतता राखण्याचा प्रयत्न
आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 320 गुन्हेगार सात दिवसाकरिता हद्दपार करण्यात आले. कलम 144 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळं सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
वर्धा : धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरून राजकीय वातावरण (Political Environment) तापत चालले आहेत. हनुमान चालिसा वाचनावरून अमरावतीतील राणा दाम्पत्यांना जेलची हवा खावी लागली. अशावेळी वर्धा हा बापूंचा जिल्हा. महात्मा गांधी यांचं सेवाग्रामसारखं आश्रम इथं आहे. विनोबा भावेंच्या पावन स्पर्धानं हा जिल्हा पुनित झाला आहे. विनोबा भावेंचं पवनार इथं आश्रम आहे. असं असताना काही गुंड प्रवृत्तीचे लोकं जिल्ह्यात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी जिल्हा शांत कसा राहील, याची जबाबदारी प्रशासनावर असते. ही शांतता आबादित ठेवण्यासाठी प्रशासनाला (Administration) महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू आहे. आगामी सण, उत्सव काळादरम्यान शहरासह जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी जिल्हा पोलीस विभागाने (District Police Department) जिल्ह्यातील तब्बल 320 सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्ह्यातून 7 दिवसांसाठी हद्दपार केल्याची माहिती आहे.
सणानिमित्त शांतता कायम राहावी
मागील वर्षी पोलीस विभागाने 200 गुन्हेगारांना हद्दपार केले होते. आगामी रमजान ईद या सणानिमित्त सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये, म्हणून पोलीस विभागाने यंदा तब्बल 320 सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते. उपविभागीय महसूल अधिकारी यांनी गुन्हेगारांना 1 ते 7 मे या सात दिवसांसाठी हद्दपार केले आहे.
वर्धा उपविभागाचे 110 गुन्हेगार
आगामी सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील 320 गुन्हेगार सात दिवसाकरिता हद्दपार करण्यात आले. कलम 144 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यामुळं सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. गुन्हेगारांमध्ये वर्धा उपविभागाचे 110, हिंगणघाट उपविभागाचे 90, आर्वी उपविभागाचे 60 तर पुलगाव उपविभागाच्या 60 गुन्हेगारांचा समावेश आहे.