Wardha | विरुळमध्ये फोटो स्टुडिओतून प्रमाणपत्रांचे वाटप!, तहसील पथकाने कसा केला भंडाफोड?
आर्वी तालुक्यातील विरुळमध्ये बोगस प्रमाणपत्र (Bogus certificate in Virul) देण्याचे काम सुरू होते. हे प्रमाणपत्र एक फोटो स्टुडिओवाला देत होता. तहसीलदारांच्या ही बाब लक्षात आली. पुलगाव पोलिसांनी संबंधितावर कारवाई केली. आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.
वर्धा : नागरिकांना शासकीय योजनाचा ( Government Scheme) लाभ घेण्यासाठी लागणारे कागदपत्र उपलब्ध व्हावे म्हणून महा ई सेवा केंद्राची (Maha e Seva Kendra) स्थापना प्रत्येक गांवात शासनाकडून करण्यात आली आहे. मात्र विरूळ येथे चक्क फोटो स्टुडिओत नागरिकांना शासनाचे बनावट प्रमाणपत्र दिल्या जातं होते. हा धक्कादायक प्रकार आर्वी तहसील कार्यालयाच्या पथकाने उघडकीस आणलाय. या प्रकरणी पुलगाव पोलिसांत (Pulgaon Police) नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून विविध कलमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नूतन गोविंदराव सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे. चित्रलेखा फोटो स्टुडिओतून अनधिकृतरित्या हे काम सुरु होते. शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी एका महिलेने उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि कागदपत्रे तहसील कार्यालयात सादर केली.
नाव बदलवून द्यायचा प्रमाणपत्र
तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी यासंदर्भात तपासणी केली. उत्पन्नाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच नायब तहसीलदार विनायक मगर यांच्यासह काही कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले. संबंधित सेतू केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले. या पथकाने तपासणी केली असता हा बनावट कागदपत्राचा काळाबाजार उघडकीस आला अशी माहिती पुलगावचे पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांनी दिली. या फोटो स्टुडिओमध्ये विविध नावांचे जुने शासकीय प्रमाणपत्र स्कॅन करून संगणकात ठेवण्यात आले होते. कोणालाही प्रमाणपत्र लागल्यास नूतन सोनटक्के हा त्यांना त्यात फक्त नाव एडिट करून बनावट प्रमाणपत्र द्यायचा.
सांकेतांक क्रमांक दिसला एकच
हाच प्रकार कांता लक्ष्मण कवरे याच्यासोबत घडला आणि हे बिंग फुटले. कवरे यांनी कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जासोबत उत्पन्न प्रमाणपत्र व कागदपत्रे जोडली होती. त्याची तपासणी केल्यावर ते प्रमाणपत्र व त्यातील सांकेतांक क्रमांक सुनील नामदेव कोकडे यांच्या नावाचा असल्याचा आर्वीचे तहसीलदार विद्यासागर चौहान यांच्या लक्षात आले. एवढेच नव्हे तर या फोटो स्टुडिओत तहसीलच्या पथकाला विविध नावाचे बनावट प्रमाणपत्रे, मुख्याध्यापकांची सही, शिक्का असलेले अनेक महाविद्यालयांचे शाळा सोडल्याचे दाखले आणि इतर सरकारी कागदपत्रे या फोटो स्टुडिओमध्ये आढळलेत. प्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिसांनी फसवणुकीसह विविध गुन्हे दाखल केलेत. लवकरच आरोपीला अटक केली जाण्याची शक्यता आहे.