वर्धा : वर्ध्यामध्ये पोलिसांनी (Wardha Police News) चोरी करणाऱ्या चौघांना अटक केली. शेतीच्या साहित्याची चोरी करुन पळ काढणाऱ्या चोरट्यांविरोधात वर्धा पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. पण चोरट्यांना (Wardha Crime) आपलीच चूक महागात पडली. चोरीच्या सामानाची विल्हेवाट लावायला गेले आणि हे चोरटे पोलिसांच्या (Wardha Theft Arrested) नजरेत सापडले. अटक करणाऱ्यात आलेल्या चोरट्यांकडून पोलिसांनी पावणेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चोरीप्रकरणी पोलीस आता चोरट्यांची कसून चौकशी करत आहेत. शेतात चोरलेल्या लोखंडी साहित्याची विल्हेवाट या चोरट्याकडून लावली जात होती. अखेर एमआयडीसी परिसरातून या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
खरांगणा पोलिसांनी या चोरीप्रकरणी चौघांना अटक केली. तसंच चोरट्यांकडून पावणेपाच लाखांचा मुद्देमालदेखील जप्त करण्यात आला आहेय. शेतातून चोरलेल्या लोखंडी साहित्यांची विल्हेवाट लावण्यास गेलेल्या चार चोरट्यांना सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहत परिसरातून खरांगणा बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरीतील 4 लाख 95 हजार रुपयांचे 1 टन बंधाऱ्यांच्या लोखंडी प्लेट्स आणि नऊ मोटारपंप जप्त करण्यात आले.
चेतन विठ्ठल पिंपळे रा. येळाकेळी, मोहम्मद जमालुद्दीन शेख शराफत अली रा. सावजी नगर वर्धा, कौशल पुरुषोत्तम लटारे रा. येळाकेळी, मोहम्मद नदीम शेख मोहम्मद ईस्माईल शेख रा. नागपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
मोरांगणा येथील रहिवासी शेतकरी पवन शंकर लांडे आणि मंगेश पळसराम मांढरे यांच्या शेतातून मोटारपंप आणि लोखंडाचे शेतीपयोगी साहित्य चोरुन नेल्याची तक्रार त्यांनी खरांगणा पोलिसात दाखल केली होती. त्यानुसार खरांगणा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेणे सुरु केले असता चोरटे सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत चोरलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यास गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी कर्मचाऱ्यांना घेत थेट सेवाग्राम गाठून चारही चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून मालवाहू वाहनासह बंधाऱ्याच्या 1 टन प्लेटा आणि 9 मोटारपंप असा एकूण 4 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चारही चोरट्यांना अटक करुन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. अखेर त्यांना पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी खरांगणा ठाण्यांतर्गत ४, सावंगी पोलीस ठाण्यांतर्गत २ तसेच इतर ठिकाणी अशा एकूण १० चोऱ्यांची कुबूली दिली. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.