ओबीसींच्या योजना बंद करण्याचा सपाटा, मनोज चांदुरकरांचा नेमका आरोप काय?
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना केली.
महेश मुंजेवार, Tv9 मराठी, प्रतिनिधी, वर्धा : राज्यकर्त्यांनी सध्या ओबीसी विद्यार्थी, शेतकरी, महिला यांच्या हितार्थ असलेल्या योजनांना थांबा देण्याचे षडयंत्र रचलंय. असा आरोप करीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह महात्मा फुले समता परिषदेचा सहभाग होता. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांना मागण्याचे निवेदन पाठविण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सुरेश देशमुख, प्रा. दिवाकर गमे, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शिवसेना शहराध्यक्ष बाळाभाऊ मिरापूरकर, निळकंठ पिसे, सुधीर पांगुळ, बाळा माऊस्कर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांपूर्वी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना केली. या संस्थेला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 824 कोटी रुपये निधी दिला.
पण सतांतर होताच महाज्योतीमधील योजना बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुध्दा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे नाहीत. त्यामुळे ओबीसींच्या गरीब गुणवंत विद्यार्थ्यांना मोठ्या शहरात चांगल्या संस्थांमधे प्रवेश मिळूनही वसतिगृहाअभावी त्यांना परत यावे लागते.
महाज्योतीने स्व निधीमधून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना प्रस्तावित केली. अशा विद्यार्थ्यांना वर्षाकाठी 80 हजार रुपये, आधार निधी देण्याची योजना आखली. परंतु, सतांतर झाल्याबरोबर ही योजना रद्द केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांनी यावेळी केला.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांना मंजुरी मिळाली आहे. पण, निधीअभावी ही वसतिगृह रखडली आहेत. त्वरित निधी मंजूर करून वसतिगृह सुरू करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.