वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?
शकुंतला नखाते या वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्यानंतरही त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीच्या तीन तास चकरा माराव्या लागल्या. हतबल झालेल्या शकुंतला यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची खुर्चीच जप्त करा, असे सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.
वर्धा : वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गासाठी (Wardha-Nanded Railway) प्रशासनाने जमीन संपादित केली. या जमिनीसाठी वाढीव मोबदला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तो मोबदला न दिल्याने वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची वेळ आली. जप्तीसाठी तक्रारकर्ता न्यायालयीन कर्मचाऱ्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office)पोहचले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ सुरू झाली. शेवटी रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्ती केली. कोर्टाने 15 दिवसांची मुदत दिली. त्यामुळं जप्तीची नामुष्की टळली. देवळी तालुक्यातील इसापूर (Isapur, Deoli Taluka) येथील शकुंतला नखाते यांची शेतजमीन या रेल्वे मार्गासाठी घेण्यात आली. या जमिनीचा मोबदला त्यांना 2 लाख 4 हजार रुपये देण्यात आला. पण, ही रक्कम कमी आहे. त्यामुळं वाढीव मोबदला मिळावा, यासाठी नखाते यांनी न्यायालयात धाव घेतली.
दोन वर्षांपासून नाही वाढीव मोबदला
या प्रकरणी शकुंतला नखाते यांना 4 लाख 71 हजार 710 रुपयांचा वाढीव मोबदला देण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने प्रशासनाला दिले. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून शकुंतला यांना हा वाढीव मोबदला मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा न्यायालयात जप्तीसंदर्भात याचिका दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने जप्तीचे आदेश काढले. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्यासाठी तक्रारकर्ता शुक्रवारी, 11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पोहोचले. त्यांच्यासोबत न्यायालयीन कर्मचारी होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी हा विषय निकाली काढण्यासाठी शकुंतला यांच्याकडे संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंतचा वेळ मागितला.
कर्मचाऱ्यांची उडाली धावपळ
उपजिल्हाधिकारी मनोजकुमार खैरनार आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी न्यायालय गाठले. तक्रारदाराला मोबदला देण्यासाठी काही वेळ देण्याची विनंती केली. येत्या 15 दिवसांत मोबदला देण्यात येईल, अशी हमी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरील जप्तीची नामुष्की टळली. शकुंतला या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. त्यानंतरही त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीच्या तीन तास चकरा माराव्या लागल्या. हतबल झालेल्या शकुंतला यांनी न्यायालयीन कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची खुर्चीच जप्त करा, असे सांगितले. त्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यानंतर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्याशी चर्चा करण्यात आली.