वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तारखा जाहीर झाल्यापासून तिकिटासाठी सगळीकडे फिल्डिंग लावली जात असलेली पाहायला मिळाली आहे. अशातच सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले फेम खदखदsss कराळे गुरूजी यांनीही शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमदेवारी कशी सक्षम आहे हे कराळे गुरूजींनी सांगितलं. कराळे यांनी मविआमधून कोणत्याही पक्षाकडून उभं राहण्याची तयारी दर्शवली आहे. कराळे गुरूजी नेमके कोण आहेत? राजकारणामध्ये का एन्ट्री करतायेत जाणून घ्या.
नितेश बाळकृष्ण कराळे असं त्यांचं पूर्ण नाव आहे. वर्धा तालुक्याच्या मांडवा येथील शेतकरी कुटुंबातील नितेश कराळे यांनी बीएससी बीएड शिक्षण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना काही यश मिळालं नाही. अपयश आल्याने खचून न जाता त्यांनी माघारी येत पुणेरी पॅटर्न नावाने मार्गदर्शन करणारे क्लास सुरू केले. वऱ्हाडी बोलीवर चांगली पकड असल्याने त्यांनी आपल्या शैलीत विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी फोनिक्स अकादमी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात विद्यार्थींनी त्यांच्याकडे प्रवेश घेतला होता. मात्र कोरोनामुळे सर्व काही बंद झालं.
कोरोनामध्ये त्यांनी गुगल मीट, zoom मीटिंगच्या मदतीने क्लास घेण्यास सुरूवात केली होती. मात्र त्यानंतर गुरूजींनी यू-ट्यूबवर व्हिडीओ पोस्ट केले. व्हिडीओसुद्धा असे खास होते की त्यांनी वऱ्हाडी बोलीभाषेचा तडका देत कठीण गोष्ट सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितली. गुरूंजींची ग्रामीण भाषेत शिकवण्याची शैली कुणाला पसंत पडली तर काहींनी टीकाही केली. भूगोल विषयातील खद् खद् हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
प्रसिद्धीस आलेल्या कराळे गुरूजींनी अकादमीसोबत विद्यार्थी, शेतकरी आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 2020 मध्ये कराळे गुरूजी नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहिले होते. या निवडणुकीध्ये कराळे गुरूजींना 8500 मते मिळाली होतीत. गुरूजींना मिळालेली मते नेकांना थक्क करणारी होतीत. त्यानंतर सामाजिक प्रश्नांना घेऊन आपली भूमिका सुरूच ठेवली आहे. आता यंदा त्यांना लोकसभेचं तिकिट मिळतं का? जर तिकिट नाही मिळालं तर कराळे अपक्ष उभे राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.