Wardha Police | वर्ध्यात मशिदींवरील भोंगे परवानगीने; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे करणार पालन
भोंग्याच्या मुद्यावरून होणाऱ्या आंदोलनाच्या दृष्टीने सर्व पोलीस स्टेशनं अलर्ट होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण 1 हजार 800 पोलिसांचा आज बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यात लावण्यात आला होता. एवढंच नव्हे तर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सायबर सेलकडून सोशल कॅम्पेन राबविण्यात येत आहे.
वर्धा : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे न हटविल्यास मशिदींसमोर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर वर्धा पोलीस दल सतर्क होते. आज मशिदी समोर तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. सगळीकडे सकाळची अजान भोंग्याविना झाली असल्याचं चित्र होतं. वर्धा जिल्ह्यात 1 हजार 250 मंदिरं, 90 मशिदी, 131 बुद्ध विहार, 43 मदरसे, 75 इदगाह, 13 चर्च तर 6 गुरुद्वारा आहेत. सर्वधार्मिक स्थळानी भोंगे लावण्यासंदर्भात पोलिसांकडून परवानगी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या सर्वाना नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी (Yashwant Solanki) यांनी दिली.
आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास कडक कारवाई
भोंग्याच्या मुद्यावरून होणाऱ्या आंदोलनाच्या दृष्टीने सर्व पोलीस स्टेशनं अलर्ट होते. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण 1 हजार 800 पोलिसांचा आज बंदोबस्त संपूर्ण जिल्ह्यात लावण्यात आला होता. एवढंच नव्हे तर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सायबर सेलकडून सोशल कॅम्पेन राबविण्यात येत आहे. जाती, धर्माच्या भावना दुखवतील अशा पोस्ट, मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी पोलीस मित्रांची मदत घेतली जात आहे. आक्षेपार्ह पोस्ट दिसल्यास कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
हनुमान चालिसासाठी एकाच ठिकाणी परवानगी
नागपुरात मशिदीवरील भोंग्यांच्या आवाजा विरोधात आज मनसेनं आंदोलन केलं. मनसेकडून नागपुरातील सोनेगाव तलाव हनुमान मंदिर परिसरात हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरे यांचे आदेश पाळत आम्ही शहरात 33 ठिकाणी चालिसा पठणाची परवानगी मागितली होती. पण पोलिसांनी एका ठिकाणची परवानगी दिलीय. त्यामुळे सोनेगाव तलाव हनुमान मंदिर परिसरात हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. भविष्यात आंदोलन सुरु राहील, असं यावेळी मनसेचे नेते हेमंत गडकरी यांनी सांगितलं.