washim: बांधलेली इमारत आरोग्य विभागाची की शौचालयाची ? लोकांना विसर, शौचालयासाठी सर्रास वापर
आमदार, खासदार, नेते मंडळीच्या चुका, नागरिकांनी आरोग्य विभागचं केलं शौचालय ? अधिकाऱ्यांनी घातली तोंडात बोटं
वाशिम : वाशिमच्या (Washim) मालेगाव (Malegaon) तालुक्यातील मुसळवाडी (Musalwadi) येथे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. परंतु तिथले नागरीक या इमारतीचा उपयोग शौचालयासाठी करत असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे बांधण्यात आलेली इमारत आरोग्य विभागाची की शौचालयाची ? असा प्रश्न काही जागृत नागरिक विचारु लागले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील मुसळवाडी हे गाव आदिवासी बहूलवस्ती म्हणून ओ ळखले जाते. स्वातंत्र्यच्या 75 वर्षांनंतरही या गावातील नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहित. आजही या गावात आरोग्य, रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी, दळण वळण सारख्या मुलभूत सोयी सुविधांची वाणवा असल्याचं दिसून येतंय.
मुसळवडी या गावातील नागरीक सोयी सुविधेपासून अद्यापही कोसो दूरच आहेत.या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आमदार,खासदार व नेते मंडळी असल्याचं गावकरी सांगत आहेत. निवडणुका आल्या की त्यांना गावातील मतदार राजा आठवतो. एकदा निवडून आलं की, लोकांचा लोकप्रतिनिधीला विसर पडतो.
मुसळवाडी येथे 2016 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निर्मितीसाठी मंजुरी मिळाली होती. इमारत बांधकामासाठी 2 कोटी 59 लाख, 79 हजार 935 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. 3 सप्टेंबर 2016 रोजी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. बांधकामाची मुदत 18 महिन्याची असल्याने या आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास 5 वर्ष पूर्ण झाले आहेत. तरी सुद्धा शासन प्रशासन या आरोग्य केंद्राच उदघाटन करीत नसल्याने रोष व्यक्त केला जात आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना सोयीस्कर होण्यासाठी दवाखाण्याची उभारणी करण्यात आली. मात्र तीन वर्षे झाले हा दवाखाना सुरू नसल्याने दुसरी सुविधा मिळत नाही. त्यामुळं अनेक रुग्णांना अकोला व वाशिम येथे रुग्णालयात जावं लागत आहे.