विखे पाटील रंग बदलणारा सरडा, अरविंद सावंत यांची जहरी टीका; आदित्य ठाकरे यांच्यावरील टीकेवरून संताप
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथे केलेल्या गौप्यस्फोटावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली होती त्यावर अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे.
वाशिम : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बंड करण्यापूर्वी मातोश्रीवर येऊन रडले होते, भाजपसोबत गेलो नाहीतर मला जेलमध्ये टाकतील असं म्हंटलं होतं असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील एका कार्यक्रमात केला होता. त्यावर राज्यात खळबळ उडलेली असतांना भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये अशी टीका करत असतांना पुढे खूप आव्हान आहे, आपल्या वक्तव्यावर आवर घाला असे म्हंटले होते. त्यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. थेट राधाकृष्ण विखे पाटील यांचा इतिहास काढत रंग बदलणारा सरडा असल्याचे म्हंटले आहे.
वाशिम दौऱ्यावर असतांना टीव्ही 9 मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेवर अरविंद सावंत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. राधाकृष्ण विखे पाटील हा रंग बदलणारा सरडा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेवर अरविंद सावंत म्हणाले, विखे पाटील हा सरडा असलेला व्यक्ती आहे. त्या रंग बदलणाऱ्या सरड्याची तुम्ही दखल का घेता? या पक्ष्यातून त्या पक्षात. ते आमच्याकडे होते ना? त्यांना विचारा कोणता पक्ष शिल्लक उरला का? असा हल्लाबोल सावंत यांनी केला आहे.
खरंतर आदित्य ठाकरे यांनी केलेल्या गौप्यस्फोटावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी आदित्य ठाकरे बालिश असल्याचे म्हंटले होते. तर संजय राऊत यांच्यासह कॉंग्रेस नेत्याने आदित्य ठाकरे यांचा दावा खरा असल्याचे म्हंटले आहे.
राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले होते? आदित्य ठाकरेंचा पप्पू होवू नये, सत्ता गेल्यानंतर शहाणपण येईल असं वाटत होतं. एकनाथ शिंदे हे रडणारे नेते नाहीत. लढणारे नेते आहेत. याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे. सत्ता गेल्याचं वैफल्य आदित्य ठाकरेला झालं आहे. त्यामुळे स्वतःलाच रडू आवरत नाही. आपल्या वक्तव्यावर थोडा आवर घातला पाहीजे. आपल्यापुढे अजून मोठं आव्हान आहे. मोठ्यांचा आदर करायला शिकलं पाहीजे. वक्तव्यामुळे आपला पप्पू होवू नये याची काळजी घ्यायला हवी.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते? हैदराबाद येथील एका चर्चा सत्रात आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. त्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले होते की एकनाथ शिंदे यांनी बंड करण्याआधी मातोश्रीवर आले होते. रडले होते. त्यांनी सांगितलं होतं की भाजपसोबत गेलो नाहीतर मला जेलमध्ये टाकतील.