विदर्भात पावसाचा जोर सुरूच, नाल्याच्या पुरात युवक दुचाकीसह वाहून गेला
नाला पार करताना दुचाकी अचानक स्लिप झाली. त्यात दुचाकी वाहून जात असताना तिला वाचविण्याच्या नादात रणजित वाहून गेला.
शाहिद पठाण गोंदिया : अतिवृष्टीने आलेल्या पुराच्या पाण्यातून मार्ग काढणे एका तरुणाला जीवावर बेतले. दुचाकीने घरी परतत असलेला 22 वर्षीय तरुण नाल्यात वाहून गेला. ही धक्कादायक घटना गोंदिया शहरातील आदर्श कॉलनी जवळील भारतीय ज्ञानपीठ शाळेच्या बाजूला असलेल्या नाल्यात घडली. रणजित प्रेमसिंग गिल (वय 22 वर्षे) असे मृतकाचे नाव आहे. रणजित आपल्या मित्रासोबत रात्री 3 वाजता घरी परतत होता. अतिवृष्टीने नाला ओवरफ्लो झाला होता.
नाला पार करताना दुचाकी अचानक स्लिप झाली. त्यात दुचाकी वाहून जात असताना तिला वाचविण्याच्या नादात रणजित वाहून गेला. त्याचा शोध बचाव दलाकडून केला जात आहे.
गोंदिया शहरातील रिंग रोडवरील आदर्श कॉलनीला तलावाचे स्वरूप आले. अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली. काल दुपारपासून सुरु झालेल्या या पावसाने संध्याकाळी मुसळधार स्वरूप धारण केले.
परिणामी अनेक सखल भागात पाणी शिरल्याने तलावाचे स्वरूप आले आहे. विशेष म्हणजे याचा सर्वाधिक फटका आदर्श कॉलनीला बसला. लोकांच्या घरातही पाणी शिरल्याने लोकांनी आपल्या आवश्यक वस्तू बचाव करण्यासाठी धडपड केल्याचे दिसून आले.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून जोरदार पाऊस झालाय. त्यामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झालाय. पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करत आहेत.
जोरदार पावसामुळे तलाव, धरण , नाले, विहिरी, मोठ्या प्रमाणात भरले आहेत. पारखेड शिवारातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे सोयाबीन, पराटी, तूर, उडीद, मूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
शेतीसाठी लावलेला खर्च सुद्धा निघेनासा झालाय. बँकेतील कर्ज फेडणे ही मुश्कील झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिशय कठीण प्रसंग ओढवला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.