अनंतराव देशमुख भाजपात का आले?, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
अनंतराव देशमुख यांच्या येण्यामुळे भाजप मजबूत होणार आहे. वाशिम जिल्हयात नेतृत्व जिल्ह्याला मिळणार आहे.

वाशिम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज वाशिम जिल्ह्यात रिसोड दौऱ्यावर होते. काँग्रेसचे माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आज रिसोडमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. रिसोड येथे भाजप कार्यकर्ते शेतकरी, शेतमजूर, मतदारसंघातील विकास कामाच्या दृष्टीने भव्य संकल्प सभा घेतली. काँग्रेसचे माजी खासदार, तथा मंत्री अनंतराव देशमुख यांनी काही पदाधिकाऱ्यासह मुंबईत भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर रिसोड- मालेगाव विधानसभा मतदार संघात जाहीर सभा घेतली.
९ वर्षांत गरीब कल्याणाचा अजेंडा
या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अनंतराव देशमुख यांच्या येण्यामुळे भाजप मजबूत होणार आहे. वाशिम जिल्हयात नेतृत्व जिल्ह्याला मिळणार आहे. सामान्य कार्यकर्ते आणि नागरिक यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. यांच्या आशा आकांशा पूर्ण झाल्या पाहिजेत. त्यासाठी देशमुख यांनी विचार केला. अपेक्षा कुठं पूर्ण होऊ शकतात. गेल्या ९ वर्षांत केंद्र सरकारने गरीब कल्याणाचा अजंडा राबवला. प्रत्येकाच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन केलं आहे. केंद्राच्या योजना शेवटच्या माणसांजवळ पोहचत आहेत. मोदी यांच्यासोबत गेलं पाहिजे. म्हणून भाजपात येण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
वाशिमला समृद्धी महामार्गाने जोडले
चंद्रशेखर बावनकुळे हे रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करतात. त्यांच्या नेृत्वत्वात भाजपत पक्ष प्रवेश घेतला. राज्यात पुन्हा आपलं सरकार आणायचं आहे. पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मोठ्या प्रमाणात बंधारे, रस्ते, समृद्धी महामार्गाने वाशिमला नागपूर-मुंबईला जोडलं गेलं. वाशिममध्ये उद्योजक येण्यास तयारआहेत. वाशिमला बाजारपेठ मिळाल्या आहेत. मागेल त्याला शेततळं दिलं. जयुक्त शिवार योजना राबवली. शेतकऱ्यांच्या हिताच्या हजारो योजना आपण केल्या, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
पोहरादेवीला ४०० कोटींचा प्रकल्प मंजूर
२०१९ ला सरकार निवडून आलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या पाठीत खंजीर खुपसला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला. अडीच वर्षे नाकर्ते सरकार पाहायला मिळालं. अडीच वर्षात विदर्भाकरिता एक निर्णय या सरकारनं घेतला नाही. वाशिम जिल्ह्याकरिता अडीच वर्षात घेतलेला एक निर्णय दाखवा, असं आव्हान फडणवीस यांनी दिलं.
पोहरादेवीला सेवालाल महाराज यांचा मोठा प्रकल्प हातात घेतला. आपल्या काळात १०० कोटी दिले. अडीच वर्षात फुटकी कवडीदेखील मिळाली नाही. पुन्हा आपलं सरकार आलं. त्याठिकाणी ४०० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला. सेवालाल महाराज यांचे भव्य स्मारक तयार करत आहोत, असं फडणवीस म्हणाले.