BJP Lakhan Malik : अश्रूंची फूलं नाही तर होणार भाले; तिकीट नाकारल्याने आमदारांना रडू कोसळलं नि म्हणाले…
Washim Vidhansabha Constituency : विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवारांनी देव पाण्यात ठेवले. काहींना तिकीट मिळाले. तर ज्यांना उमेदवारी मिळेलच अशी खात्री होते, त्यांचा पत्ता कट झाला. काहींना पक्षाने केलेला हा व्यवहार रूचला नाही. वाशीम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार लखन मलिक यांना तिकीट न मिळाल्याने अश्रु अनावर झाले.
विधानसभा निवडणुकीला आता खरा रंग चढला आहे. प्रत्येक पक्ष उमेदवारांची नावं जाहीर करत आहे. यंदा महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना होत आहे. त्यात अनेक ठिकाणी उमेदवारच नाही तर पक्ष सुद्धा बदलेले आहे. कधी काळी एखाद्या पक्षाचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराच्या खात्यात गेला आहे. त्यामुळे तिथली सर्व समीकरणं बदलली आहे. लोकसभेनंतर अनेक बदल झाले आहेत. काही हक्काच्या उमेदवारांना घरी बसवण्यात आले आहे. तर ज्यांच्या नावाची खात्री नव्हती त्यांना लॉटरी लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत पक्षांना बंडोबाचं मोठं आव्हान असे वेगळं सांगायला नको. वाशीम विधानसभा मतदारसंघाचे आमदार लखन मलीक यांना पक्षाने असाच दे धक्का दिला. त्यांचे तिकीट कापण्यात आले.
अश्रूंना करून दिली मोकळी वाट
भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करत आतापर्यंत 121 जणांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. यामध्ये काही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. वाशीम मतदारसंघात पक्षाने अशीच भाकरी फिरवली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून लखन मलिक यांनी चार वेळा भाजपसाठी विजय खेचून आणला आहे. ते या मतदारसंघातून चार वेळा आमदार झाले आहेत. पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. दुसऱ्या यादीत आपले नाव असेल, असा विश्वास त्यांना आणि कार्यकर्त्यांना होता.
दुसरी यादी प्रसिद्ध झाली. त्यात मलिक यांना मोठा धक्का बसला. त्यांचे नाव यादीत नव्हते. तर वाशीम मतदारसंघात त्यांच्याऐवजी नवीन चेहरा देण्यात आला. लखन मलिक यांना डालवून पक्षाने शाम खोडे यांना उमेदवारी जाहीर केली. खोडे हे भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव आहेत. ही माहिती मिळताच लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना अनावर झाल्या. पक्ष निष्ठा असताना आपल्याला का डावलण्यात आले असा सवाल त्यांनी केला.
लखन मलिक बंड करणार?
आपण भाजपचे निष्ठेने काम केले. आमदारकीच्या चार कालावधीत आपण कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. कोणतीही संपत्ती जमा केली नाही. पक्षाचा विचार वाडी वस्तीपर्यंत पोहचवला. आपल्यावर जनतेचा विश्वास होता, म्हणून त्यांनी चार वेळा निवडून दिले. त्यामुळे आता कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे ते म्हणाले.