PM Narendra Modi : अर्बन नक्षलच या पक्षाला चालवत आहे, मोदींचा वाशिममधून थेट निशाणा, म्हणाले त्यांना दलितांना दलित ठेवायचंय आणि गरीबांना गरीब
PM Narendra Modi Attack on Congress : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहीण योजना, पीएम किसान, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अशा अनेक योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. त्याचवेळी मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज लाडकी बहीण योजना, पीएम किसान, नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अशा अनेक योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. वाशिममधील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरा देवी येथे त्यांनी काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका केली. मोदींनी काँग्रेसवर आतापर्यंतचा मोठा वार केला आहे. अर्बन नक्षलच या पक्षाला चालवत असल्याची जहाल टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
मोदी-गांधीमध्ये शाब्दिक वॉर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक चकमक झडत आहे. त्यातच लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी एनडीएच्या मदतीने भाजपचे सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आल्याची डिवचणी काँग्रेस देत आहे. तर आता नरेंद्र मोदी यांना देशात कोणीच घाबरत नसल्याचा चिमटा पण काढण्यात येत आहे. तर मोदी आणि भाजपने सुद्धा राहुल गांधी यांच्यावर देशाची बदनामी करण्याचा आरोप लावला आहे. त्यांना तुकडे तुकडे गँग म्हणून हल्ला चढवला आहे.
बंजारा समाजाला आम्ही सन्मान दिला
आपल्या बंजारा समाजाने अनेक संत दिले. त्या संतांनी अध्यात्मिक यात्रेला चैतन्य दिलं. इंग्रजांनी या समुदायाला गुन्हेगार घोषित केलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी करणं, त्यांना सन्मान देणं गरजेचं होतं. पण काँग्रेसने त्यांना आपल्या बरोबरीचं मानलं नाही. त्यांना वाटतं फक्त आमचीच सत्ता राहावी. त्यामुळे त्यांनी बंजारा समाजाला दूर ठेवलं. बंजारा समाजाला सन्मान देणं हे नंतरच्या सरकारची जबाबदारी होती, असे मोदी म्हणाले.
अर्बन नक्षलच काँग्रेस चालवत आहे
काँग्रेसला दलितांना दलित ठेवायचं आहे. गरीबांना गरीब करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध राहा. अर्बन नक्षल चळवळ काँग्रेसला चालवत आहे. काँग्रेसला देशाचे तुकडे करायचे आहे. त्यामुळे ते आपल्यात फूट पाडू पाहत आहे. त्यामुळे एक व्हा. ही वेळ एकत्र राहण्याची आहे. दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले. त्याचा मुख्य आरोपी काँग्रेसचा नेता निघाला. काँग्रेस तरुणांना नशेत ढकलत आहे. त्या पैशापासून त्यांना निवडणुका लढवायच्या आहेत. आपल्याला सावध राहायचं आहे. इतरांना सावध करायचं आहे. सोबत मिळून लढायचं आहे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.