वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णालयाची ( District General Hospital) स्वच्छता सेवेची मागील निविदेची मुदत संपली. नवीन निविदा प्रक्रिया मागील चार ते सहा महिन्यांपासून राबविण्यात आली. जीएम पोर्टलवर (GM Portal) ऑनलाइन निविदा मागविण्यात आल्या. त्या निविदेमध्ये पात्र दाखवण्यात आलेल्या संस्थांची कागदपत्रे परिपूर्ण नाहीत. तरीसुद्धा पात्र दाखवण्यात आले. काही संस्थांची परिपूर्ण असून सुद्धा त्यांना अपात्र दाखविण्यात आले. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. मागील दोन ते तीन महिन्यापासून स्वच्छतेची निविदा प्रक्रिया मुद्दाम थांबून ठेवण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विजय काळबांडे (Dr. Vijay Kalbande), माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धर्मपाल खेळकर, फार्मसिस्ट वानखेडे या तिघांच्या संगनमताने ही सारी प्रक्रिया होणार आहे.
यात काही तरी अपहार तथा आर्थिक व्यवहार झाल्याची तक्रार जगदीश जागृत यांनी सहसंचालक आरोग्य सेवा तथा उपसंचालक आरोग्य सेवा यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल घेत सहसंचालक आरोग्य सेवा यांनी स्वच्छता प्रकरणाची चौकशी करावी. तसेच योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश उपसंचालक यांना दिले आहेत. या सर्व प्रकरणावर आरोग्य विभागाने कार्यवाही करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
स्वच्छता सेवेकरिता टेंडर कॉल केले होते. त्यामध्ये सात संस्थानकडून निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी 3 संस्था पात्र ठरविण्यात आल्या होत्या. मात्र काही संस्थानांचे ऑबजेक्शन असल्या कारणाने त्यांचे काही कागदपत्र अपलोड होत नाहीत. त्यामुळं त्यांच्याकडून 2 मार्चला ऑफलाईन डाक्युमेंट मागून त्रुटीची पूर्तता करून ते पात्र होतात की नाही बघावे लागतील. अकोला परिमंडळाकडे उपसंचालकांकडे पाठवण्यात येणार आहे. तेथून डायरेक्टर ऑफिस मुंबई हेडकडे पात्र ठरवून पाठवणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक काळबंडे यांनी सांगितले. तर तक्रारकर्ते जागृत यांनी या निविदा संबंधित अनियमितता करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.