लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रुपयात संसार होणार आहे का?; शेतकरी महिलेचा टाहो
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांनी तहसील कार्यालयांवर तुफान गर्दी केली आहे. सरकारने अधिवास प्रमाणपत्राला पर्याय दिल्यानंतरही गर्दी होताना दिसत आहे. योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिला तास न् तास रांगेत उभ्या आहेत. मात्र, आता या योजनेवर टीकाही होऊ लागली आहे.
राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून महिलांनी संबंधित कागदपत्र घेण्यासाठी राज्यातील विविध तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली आहे. त्यामुळे अनेक तहसील कार्यालयाबाहेर महिलांची झुंबड उडाली आहे. महिलांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. मात्र, एका शेतकरी महिलेने या योजनेवर सवाल केला आहे. आम्हाला लाडकी बहीण योजनेची भीक नको. अवघ्या 1500 रुपयात संसार कसा होणार? असा सवाल या महिलेने केला आहे.
सविता पोखरकर या शेतकरी महिलेने हा सवाल केला आहे. आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दूध परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सविता पोखरकर यांनी महिला शेतकऱ्यांची माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या समोर मांडली. त्यावेळी त्यांनी हा सवाल केला. आम्ही गोठ्यातील गायी सांभाळ्यावात की गायी शासनाकडे सांभाळायला द्याव्यात हेच कळत नाही. लाडकी बहीण योजनेची भीक नको. आम्हाला दुधाला अनुदान नको तर दुधाला हमीभाव द्या, असं कळकळीचं आवाहन सविता पोखरकर यांनी केलं.
अनुदान नको, हमीभाव द्या
दुधाला 22 ते 23 रुपये भाव आणि त्यात गायी आणि म्हशींवर लम्पी रोगाचं सावट, त्यात खाद्यासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा अर्धे पैसेही मिळत नाहीत. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना गोठ्यातील गायी आम्ही सांभाळाव्यात की त्या शासनाकडे सांभाळायला द्याव्यात हेच कळत नाही. दुधाला अनुदान नको, दुधाला हमीभाव द्या. आमचं जगणं सुसह्य करा, अशी मागणी पोखरकर यांनी केली.
आम्ही शेतकऱ्याच्या लेकी
आम्ही शेतकऱ्याच्या लेकी आहोत. आम्ही कष्ट करू शकतो आणि सरकार आम्हाला लाडकी बहीण योजना काढून 1500 रुपयाची भीक देत आहे. या 1500 रुपयात संसार होणार आहे का…?, असा सवालही त्यांनी केला.
तर दूध समस्या निर्माण होईल
दरम्यान, राजू शेट्टी यांनी दूधाला हमी भाव मिळावा अशी मागणी केली आहे. दूध उत्पादकाला बाजारभाव मिळत नाही. कारण राज्यात 50 ते 60 लाख दुधावर प्रक्रिया करून पावडर आणि बटर केले जाते. दूध पावडर करणाऱ्या कंपन्यांनी खरेदीचा भाव खाली आणला आहे. त्याचा परिणाम म्हणून दुधांचे भाव कमी झाले आहेत. दूध उत्पादक शेतकरी 7 ते 8 रुपये तोट्यात दूध विक्री करत आहेत. दुधाची परिस्थिती अशीच राहिली तर शेतकऱ्याच्या गोठ्यातील जनावरे कमी होतील. राज्याला दूध टंचाईला सामोरे जावं लागेल. दूध उत्पादक शेतकऱ्याने उत्पादनावर पाठ फिरवीली एक वेगळी समस्या निर्माण होईल. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने संयुक्त रित्या उपाययोजना करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
सरकारने हमी घ्यावी
अतिरिस्त दूध पावडरची विल्हेवाट लावली पाहिजे. दुधाला किमान 40 रुपये भाव मिळाला पाहिजे. तेव्हा दूध उत्पादक शेतकऱ्याला परवडेल. 35 रुपये भाव दिल्याने शेतकऱ्याचे समाधान होणार नाही. शेतकऱ्याची मागणी ही 40 रुपये आहे. सरकार 35 रुपये भाव देईल यांची शाश्वती नाही. मागे 34 रुपये भाव सरकारने देण्याचे ठरविले होते. मात्र एकाही दूध संस्थेने भाव दिला नाही. या आदेशाला केराची टोपली दाखविली होती. सरकारने हमी घेतली पाहिजे की बाजारभाव हा 40 रुपये मिळेल, असंही शेट्टी म्हणाले.
सरकारचं चाललंय काय?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. अनेक बहिणी या योजनेसाठी रांगा लावून उभ्या आहेत. अनेक ठिकाणी सर्वर डाऊन झाल्याने ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रत्येक बहिणीला वाटते की मला 1500 रुपये मिळणार. मात्र सरकारने अनेक नियम अटी लावल्यात, त्यामुळे अनेक बहिणीची निराशा होणार आहे. सरकारचं धोरण समजत नाही. विधवा महिलेला 1000 आणि सक्षम महिलांना 1500 नक्की सरकारचे चाललं काय? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.