Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, बीड, हिंगोलीसह सोलापूर अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग

| Updated on: Sep 26, 2021 | 9:21 AM

बीडमधील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं पुसरा नदीला पूर आला होता. तर, सोलापूर, हिंगोली आणि अकोल्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे.

Weather Forecast: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, बीड, हिंगोलीसह सोलापूर अकोल्यात पावसाची जोरदार बॅटिंग
बीडमध्ये पूर
Follow us on

मुंबई: बंगालच्या उपनगरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते, ते तीव्रता होऊन आता गुलाब चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झाले आहे. आज ते ओरिसा किनारपट्टीवर आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे. त्याचाच परिणाम म्हणून   महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. सोमवारी 27 सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, बीडमधील माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं पुसरा नदीला पूर आला होता. तर, सोलापूर, हिंगोली आणि अकोल्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे. सोयाबीन काढणीच्या वेळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे.

बीडमध्ये पुसरा नदीला पूर

बीडच्या माजलगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यानं पुसरा नदीला पूर आला आहे. पुसरा, तिगाव, चिंचाळा गावाचा संपर्क तुटला होता. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचं ही प्रचंड नुकसान झालं आहे. वडवणी तालुक्याला ही पावसाने झोडपले असून हरिश्चंद्र पिंपरी, चिंच वडगाव, काडी वडगाव नदीला पूर आला आहे.

अकोल्यात मुसळधार पाऊस

अकोला जिल्हातल्या अंधारसावंगी व पांढुरणा भागात जोरदार पाऊस मध्यरात्रीच्या वेळी झाला. चोंढी धरणाच्या पातळीत मोठया प्रमाणात वाढ होत असून आजूबाजूच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सोलापूरमध्ये बोरी नदीला पूर

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यामध्ये सलग दोन दिवस पाऊस सुरु असल्याने बोरी आणि हरणा नदीला पूर आला आहे. या पावसामुळे बोरी उमरगे पुलावर पाणी आल्याने अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, गाणगापूर या महामार्गावरील गावांचा काल दिवसभर संपर्क तुटला होता. मागच्या दोन दिवसांमध्ये 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र,या पावसाने ऐन काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले आहे.यामुळे बळीराजाच्या अडचणीमध्ये भर पडली आहे.

सोलापूरमधील जवळगाव मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो

गेल्या चार – पाच दिवसांपासून उत्तरा नक्षत्रातातील पावसाचा लपंडाव सुरू असताना काल वैराग परिसरात जोरादार पावसाचे पुनरागमन झाले. मुसळधार झालेल्या पावसाने जवळगाव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला असून, ओव्हर फ्लो झाला आहे. काल बार्शी तालुक्‍यात पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या एकतीस वर्षात पाचव्यांदा हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे.

हिंगोलीत जोरदार पाऊस

हिंगोली जिल्ह्यात सलग साहव्या दिवशी ही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सततच्या पावसाने सोयाबिन पीक गेले असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

इतर बातम्या:

 भंडाऱ्यातील मोहाडी शहरात पाणी साचलं, चंद्रपुरात मुसळधार पावसानं दाणादाण

Weather Forecast : कोकण विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो ॲलर्ट जारी

 

Weather Forecast IMD Predict heavy rain fall in Maharashtra today due to impact of Gulab Cyclone