मुंबईः हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज 11 सप्टेंबर रोजी राजधानी दिल्लीसह (Delhi) देशातील अनेक राज्यात जोरदार, मध्यम आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला लागून असलेल्या वायव्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस (Heavy Rain) पुन्हा सक्रिय झाला असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवरही (coastal line) सध्या जोरदार पाऊस असून या भागाला वादळाचा फटका बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील 24 तास देशातील अनेक भागत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक किनारीपट्टीवरील भागात पावसाचे प्रमाण अधिक वाढणार आहे.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात जोरदार तर विदर्भ आणि मराठवाड्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामान बदलले असून उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.
भारतातील अनेक राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून हा पाऊस दक्षिण भारतात पुन्हा मुसळधार होण्याची शक्यता आहे. पुढील 4 ते 5 दिवस देशातील नैऋत्य भागात पाऊस जोर धरणार असल्याचेही हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान अंदाज एजन्सी स्कायमेटच्या मते, पुढील २४ तासांत आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा, दक्षिण छत्तीसगड, तेलंगणा, उत्तराखंड आणि महाराष्ट्रातहा हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. दक्षिण गुजरात, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि कर्नाटकातील किनारीपट्टीवर हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे.
तर याचबरोबर मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओडिशा, केरळबरोबरच कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीरच्या काही भागात आणि गुजरातमध्येही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. बिहार, झारखंड, तामिळनाडू, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटे आणि पूर्व गुजरातमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.