Weather Alert | महाराष्ट्राचं तापमान घसरलं, कोकणात पावसाची शक्यता, काय सांगतोय IMD चा अहवाल?
संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती राहिल. कोकणात आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येतील, असा इशारा विभागानं दिला आहे.
औरंगाबादः राज्यभरात मागील महिन्यात अचानक उष्णतेची लाट (Heat wave) आली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत मार्च महिन्यातच उन्हाचा आणि गर्मीचा कहर जाणवत होता. औरंगाबादेत तर तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला होता. विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही सूर्य चांगलाच तळपू लागला होता. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) दिला असताना, कालपासून औरंगाबादसह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील तापमानाचा पारा 2 ते 3 अंशांनी घसरला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अंदमान निकोबार बेटांवर चक्रिवादळाचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जिल्ह्यांवरही काही प्रमाणात याचा परिणाम जाणवेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
राज्यात ढगाळ वातावरण
भारतीय हमामान खात्याचे पुणे येथील प्रमुख के.एस. होसळीकर यांनी येत्या 24 तासांच्या हवामान अंदाजाविषयीचे ट्वीट केले आहे. त्यानुसार, अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले असून चक्रीवादळापूर्वीची ही स्थिती आहे. पुढील 12 तासात या स्थितीचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरणाची स्थिती राहिल. कोकणात आज तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटा येतील, असा इशारा विभागानं दिला आहे. गोवा, कोल्हापूर, सांगली आणि मिरजमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली होती. हादेखील कमी दाबाच्या पट्ट्याचाच परिणाम होता. तसेच 22 ते 23 मार्च पर्यंत राज्यात ही स्थिती निवळेल, त्यानंतर पुन्हा एकदा तापामानाचा पारा वाढून उष्णतेची लाट येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईचं तापमान 8 अंशांनी घसरलं
रविवारी मुंबईचं तापमान अचानक आठ अंशांनी घसरलं. मागील आटवड्यात 39 अंशांवर तापामानाचा पारा गेला होता. मात्र रविवारी मुंबईतील सांता क्रूझ वेधशाळेने किमान तापमान 31.7 अंश सेल्सियस अशी नोंद घेतली आहे. कुलाबा वेधशाळेने किमान तापमान 24 ते 23 अंश सेल्सियस एवढे नोंदवले. मुंबईत रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरणाची स्थिती दिसून आली.सोमवारीदेखील हीच स्थिती कायम आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात कोल्हापूरचं तापमान 2.6, महाबळेश्वर 2.3, नाशिकचं 3.7 तर सातार्याचं 3.5 आणि सांगलीचं तापमान 2.3 अंशांनी घसरलं. तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी शनिवारच्या तुलनेत रविवारच्या तामपानात किंचित घट दिसून आली.
21 March, Min temp Colaba 23.5, Rel Hum 95% Santacruz 23, Rel Humidity 74% Nashik 20.5, Kolhapur 21.9 Parbhani 24.6 MWR 18.6, Pune 21.1 ढगाळ वातावरण राज्यात …latest satellite obs at 9 am. pic.twitter.com/M0kehfEcTw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 21, 2022
असानी चक्रिवादळाचा अंदाज काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतात चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. असानी नावाचं हे चक्रिवादळ अंदमान निकोबारच्या बाजूने म्यानमारच्या दिशेने जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळाचा धोका ओळखून अंदामानमध्ये एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. बंगालच्या उपसागरावर तयार झालेला हा कमी दाबाचा पट्टा 21 मार्चपर्यंत चक्रीवादळात रुपांतरीत होईल. अंदमान निकोबार बेटांच्या समूह आणि समुद्र किनारपट्टीवर हे वादळ वेगाने पोहोचेल. त्यानंतर हे वादळ उत्तर पूर्व दिशेने वाढण्याची आणि 22 मार्चपर्यंत उत्तर म्यानमार येथे दक्षिण-पूर्व बांग्लादेश किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाने समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना चक्रिवादळाची पूर्वसूचना दिली असून मच्छिमारांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
इतर बातम्या-