वांद्रे टर्मिनस येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वेची प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसवर लांबपल्ल्याची अंत्योदय एक्सप्रेस पकडताना रविवारी पहाटे चेंगराचेंगरी होऊन नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. यातील दोघा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.
पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या वांद्रे टर्मिनस येथे चालत्या गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांची चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली होती. या प्रकरणात रेल्वे प्रशासनाने आता प्लॅटफॉर्मवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीटांच्या विक्रीवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्रे टर्मिनसवर वांद्रे गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस क्र.22921 यार्डातून फलाट क्रमांक एकवर येत असताना जनरलच्या प्रवाशांनी जागा पकडण्यासाठी चालती गाडी पकडण्याचा प्रयत्न केल्याने एकच गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी होऊन अनेक प्रवासी जखमी झाले होते.
दिवाळीच्या सुट्ट्या तसेच छटपूजेच्या निमित्ताने उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांना मोठी गर्दी उसळली आहे.त्यामुळे प्रवाशांची रेल्वे स्थानकांवर गाड्या पकडण्यासाठी गर्दी उसळत आहे. रविवारी पहाटे 2.45 वाजता वांद्रे गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेस क्र.22921 यार्डातून फलाट क्रमांक 1 वर येत असताना जनरल तिकीट असणाऱ्या प्रवाशांची जागा मिळण्यासाठी चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले. जखमीपैकी दोन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री बंद
या प्रकरणामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीचा निर्णय म्हणून पश्चिम रेल्वेच्या लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या दादर, मुंबई, वांद्रे टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री तातडीने थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या फलाटावरील आरपीएफ, जीआरपी, होमगार्ड यांच्या बंदोबस्तात वाढ देखील करण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या सर्व टर्मिंनसवरील प्लॅटफॉर्म तिकीटांची विक्री येत्या 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत बंद करण्यात आल्याची माहीती रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.
मध्य रेल्वेची देखील बंदी
मध्य रेल्वेने देखील लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मवरील तिकीटांची विक्रीवर 8 नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली आहे.
जखमींची नावे
जखमीत शबीर अब्दुल रहमान (40), परमेश्वर सुखदार गुप्ता (28), रवींद्र हरिहर चुमा (30), रामसेवक रवींद्र प्रसाद प्रजापती (29), संजय तिलकराम कांगे (27), दिव्यांशु योगेंद्र यादव (18), मोहम्मद शरीफ शेख (25), इंद्रजीत सहानी (19), नूर मोहम्मद शेख (18) समावेश असून इंद्रजीत सहानी आणि नूर मोहम्मद शेख यांची प्रकृती चिंताजनक आहे.