पालघर मालगाडी अपघात; CET, NEET च्या परीक्षार्थींचे हाल, रुळ दुरुस्तीचे काम संध्याकाळी संपणार? डहाणू ते विरार लोकल सेवा केव्हा सुरु होणार?
पश्चिम रेल्वेच्या पालघर यार्डात लोखंड वाहणारी एक मालगाडी काल सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घसरली. त्यामुळे सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. या मार्गाचे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. डहाणू ते विरार लोकल सेवा बंद असल्याने सीईटी आणि नीटच्या परीक्षार्थ्यींचे हाल झाले आहेत.
पश्चिम रेल्वेच्या पालघर यार्डात मालगाडी घसरुन 20 तासांहून अधिक वेळ झाला आहे. या अपघातामुळे सुरत ते मुंबई अप मार्गाची लांबपल्ल्याची वाहतूक सेवा ठप्प झाली होती. विरार ते डहाणू लोकल सेवा देखील बंद आहे. काल गुजरातहून येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास मधल्या स्थानकात स्थगित करण्यात आल्याने मुंबईत येणाऱ्यांना खाजगी वाहने, एसटी सेवा अशा वाहनांचा आसरा घेत मुंबई गाठावी लागली. दुपारी 12.30 वाजेपर्यंत 41 ट्रेन रद्द करण्यात आल्या तर 28 ट्रेन अंशत: रद्द, 12 ट्रेन वळविण्यात आल्या आणि 22 ट्रेनचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे, डहाणू रोडहून मुंबई उपनगरीय लोकल सेवा सुरु होण्यास सायंकाळ होणार आहे. विद्यार्थ्यांच्या CET, NEET च्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने गाड्या सोडण्याची मागणी होत होती. परंतू दुरुस्तीचे काम सायंकाळी उशीरापर्यंत सुरु राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
पश्चिम रेल्वेच्या अप मार्गावर मुंबई आणि सुरत सेक्शनमध्ये पालघर यार्डात लोखंड वाहणारी एक मालगाडी काल मंगळवारी सायंकाळी 5.08 वाजताच्या दरम्यान घसरली. या मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडाची वाहतूक केली जात होती. ही घटना पालघर यार्ड लाईनमध्ये घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मुंबई ते सुरत अप मार्गावरील काल सायंकाळपासून कोलमडलेली वाहतूक सेवा 22 तासांनंतरही सुरळीत झालेली नाही. या घटनास्थळावरुन रुळांवरुन घसरलेले मालगाडीचे डबे उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरल्याने रुळांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची बातमी समजताच नंदूरबार, उधणा, आणि वांद्रे टर्मिनस आणि वलसाड येथून ART व्हॅन मागविण्यात आली. मालगाडीचे डबे रुळांवरुन उचलणे, क्षतिग्रस्त सिमेंट बदलणे आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरु असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
येथे पाहा पश्चिम रेल्वेची पोस्ट –
@ Derailment of Goods Train at Palghar on 28.05.2024
The following Local trains to and from Dahanu Road on 29.05.2024 are fully cancelled
93017 Virar – Dahanu Road 93019 Virar – Dahanu Road 93021 Virar – Dahanu Road 93023 Virar – Dahanu Road 93025 Dahanu…
— Western Railway (@WesternRly) May 29, 2024
सीईटी आणि नीटच्या परीक्षा असल्याने हाल
अपघातातील मालगाडीचे डबे हटविण्याचे काम सुरु असताना ट्रेनची वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत डाऊन दिशेच्या 41 ट्रेन आणि अप दिशेच्या 9 ट्रेनना मार्गस्थ करण्यात आले आहे. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा या अपघातामुळे ठप्प झाली आहे. या अनेक ट्रेन रद्द झाल्याने प्रवासी प्रचंड हाल झाले आहेत. आज सीईटी, नीटच्या परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे ट्रेन सोडण्याची मागणी केली जात आहे. परंतू रेल्वे प्रशासन ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.