शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? कृषी खातं मिळताच मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितला प्लॅन

| Updated on: Dec 24, 2024 | 6:38 PM

नवे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे लासलगाव दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रतिक्रिया दिली.

शेतकऱ्यांसाठी काय निर्णय घेणार? कृषी खातं मिळताच मंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितला प्लॅन
Follow us on

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या मंत्र्यांना आता खाते वाटप देखील करण्यात आलं आहे. खातं जाहीर होताच त्या – त्या खात्याचे मंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी राज्यचं कृषीमंत्रिपद हे महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. माणिकराव कोकाटे हे राज्याचे नवे कृषीमंत्री आहेत. दरम्यान आज माणिकराव कोकाटे हे लासलगाव दौऱ्यावर आहेत, यावेळी बोलताना त्यांनी आपल्या कामाची पुढील दिशा स्पष्ट केली.

नेमकं काय म्हणाले कोकाटे? 

कृषीमंत्री झाल्यानंतर पहिला दौरा आहे, आमचे मित्र कल्याणराव यांच्या घरी आलो आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी आम्ही मागणी केली होती. माझ्या वाट्याला आता कृषी खाते आले आहे.  कृषी खातं हे जबाबदारीचं खातं असून तो काटेरी मुकुट आहे. अवकाळी पाऊस, बाजारभाव असे अनेक प्रश्न निर्माण होत असतात.  धोरणात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल,  शेतीच्या क्षेत्रात कायम जे प्रश्न निर्माण होत असतात त्यावर निर्णय घेतले जातील, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, विम्याच्या संदर्भात कोणी गैरफायदा घेतला तर त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल. शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला शेतकऱ्यांचे प्रश्न माहित आहेत. ओला दुष्काळ पडला असेल तर त्यावर निर्णय येत्या काळात घेऊ. युती सरकार भक्कम आहे. मी कोणाच्या विरोधामुळे लासलगावला आलो नाही तर माझा लासलगावशी जुना संबंध आहे. मी जे बोलतो तेच करतो, मी मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर योग्य ते निर्णय घेईल.

दरम्यान एकीकडे यावेळी राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं मात्र दुसरीकडे छगन भुजबळ यांचा पत्ता मंत्रिमंडळातून कट करण्यात आला आहे. मंत्रिपद मिळालं नसल्यामुळे भुजबळ नाराज आहेत, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांच्या स्वागतासाठी जे बॅनर लावण्यात आले होते, त्यावरून देखील भुजबळांचा फोटो गायब होता, भुजबळांऐवजी त्यांचे कट्टर राजकीय शत्रू असलेल्या कांदे यांचा फोटो होता, यावरून देखील चर्चेला चांगलंच उधाण आलं.