संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या 24 तास आधी नेमकं काय घडलं होतं? पत्नी अश्विनी देशमुख यांचा मोठा खुलासा
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 24 तास आधी नेमकं काय घडलं? याबाबत आता त्यांची पत्नी अश्विनी देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. वातावरण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण होण्यापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अश्विनी देशमुख?
‘मला जास्त काही माहिती नाही, ते फक्त एवढेच बोलले थोडी किरकिरी झाली, त्यांना भीती वाटते. ते टेन्शनमध्ये होते मी त्यांना विचारलं काय झालं काय नाही, त्यांनी सांगितलं थोडे भांडण झाले आहेत. ते लोक जरा गुंड प्रवृत्तीचे आहेत, मला भीती वाटते असं त्यांनी मला सांगितलं. त्यांना भीती वाटत होती ते दोन दिवस सारखं टेन्शनमध्ये होते. त्यांना सारखे फोन येत होते, पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही, पण त्यांना फोन येत होते. फोनवर काय बोलणं सुरू होतं ते काय मी ऐकलं नाही.
9 तारखेला ते लातूरहून मस्साजोगला आले होते, त्यांना सोमवारचा उपवास असतो म्हणून मी त्यांना सोमवार सोडल्याशिवाय जाऊ नका म्हटलं, त्या दिवशी जाऊ नका म्हटले होते. त्यानंतर ते घरी थांबले थोडी उसळ खाल्ली त्यानंतर ते झोपले. पण त्यांना सारखे फोन येत होते, त्यामुळे ते साडेअकरा बाराच्या सुमारास गावाकडे आले. ते थांबले नाहीत त्यांना कुणाचे फोन येत होते म्हणून ते आले, आणि ही घटना घडली, असं अश्विनी देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आरोपींना लवकरात लवकर पकडावं, त्यांना शिक्षा करावी. फरार असलेला एक आरोपी पकडण्यासाठी इतका का वेळ लागत आहे? लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि त्यांना कठोर शिक्षा द्या, अशी मागणी देखील यावेळी अश्विनी देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान आता वातावरण चांगलंच तापलं असून, वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यासाठी आज मस्साजोगमध्ये ग्रामस्थांनी टाकीवर चढून आंदोलन केलं. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते.