Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाची पाळेमुळे नेमकी कशात?, किती जुना आहे हा वाद?, पवारांची यातली भूमिका काय ?

राज्यात प्रमुखपणे ब्राह्मण विरुद्ध मराठा, ब्राह्मण विरुद्ध दलित आणि दलित विरुद्ध मराठा असे तीन जातीवाद प्रामुख्याने वर्षांनुवर्षे आहेत. यावर सार्वजनिक चर्चा होत नसली, तरी याबाबत कट्टरता आणि दबक्या आवाजातील चर्चा मात्र नेहमीच सुरु असते. शरद पवार यांच्या ब्राह्मण संघटनेच्या भेटीच्या निमित्ताने यातील मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पुन्हा एकदा नव्याने राज्यात चर्चेला आला आहे.

महाराष्ट्रातील मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाची पाळेमुळे नेमकी कशात?, किती जुना आहे हा वाद?, पवारांची यातली भूमिका काय ?
maratha vs brahmin
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 3:28 PM

मुंबईमहाराष्ट्रात (Maharashtra)विविध जाती जरी एकत्रित राहत असल्या तरी राज्यात अनेक जातीजातींतील वादांची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. त्यात ब्राह्मणब्राह्मणेतर वाद हा प्रामुख्याने आहे, त्यात प्रमुखपणे ब्राह्मण विरुद्ध मराठा, (Maratha vs Brahmin)ब्राह्मण विरुद्ध दलित आणि दलित विरुद्ध मराठा असे तीन जातीवाद प्रामुख्याने राज्यात वर्षांनुवर्षे आहेत. यावर सार्वजनिक चर्चा होत नसली, तरी याबाबत कट्टरता आणि दबक्या आवाजातील चर्चा मात्र नेहमीच सुरु असते. शरद पवार यांच्या ब्राह्मण संघटनेच्या भेटीच्या निमित्ताने यातील मराठा विरुद्ध ब्राह्मण हा वाद पुन्हा एकदा नव्याने राज्यात चर्चेला आला आहे. मराठ्यांचे राजकारण करणारे नेते अशी शरद पवार (Sharad Pawar)यांची ओळख आहे. काँग्रेसमध्ये असताना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ साली स्थापना केल्यानंतरही त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर जे राजकारण केले, किंवा ज्या संघटनांच्या पाठिशी ते उभे राहिले, त्यांची काही वक्तव्ये यातून हा वाद सातत्याने ज्वलंत ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, असा त्यांचावर आरोप सातत्याने करण्यात येतो. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कन्यादानाच्या निमित्ताने केलेल्या वक्तव्यानेही हा वाद चिघळला होता. मात्र एवढ्यापुरताच हा वाद मर्यादित नाही. महाराष्ट्रात या वादाला खूप जुने कंगोरे आहे.

ज्ञानेश्वरतुकारामांच्या काळापासूनचा वाद

संत ज्ञानेश्वरांचा काळ हा सुमारे ७००८०० वर्षांपूर्वीच्या मानला जातो, त्याही काळात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वाद हा महाराष्ट्रात होताच. संत ज्ञानेश्वरांनाही ब्राह्मण असतानाही, त्यांच्या भावडांसह याच कर्मठ ब्राह्मणांचा त्रास सहन कारावा लागला. त्यातूनच भगवतगीता संस्कृतातून मराठीत यावी यासाठी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. यातून धार्मिक क्षेत्रात ब्राह्मणेतर समाज आणि संतांचे कार्य त्यानंतर विस्तारले. त्यानंतर संत तुकारामांनाही याच ब्राह्मण परपरांचा त्रास सहन कारावा, अगदी गाथा नदीत बुडवेपर्यंत त्यांना याचा त्रास सहन करावा लागला. पंढरपुरातील महाराष्ट्राचे आराध्य दैवत हे नेहमीच बडव्यांनी घेरलेले असते, असाही आरोप अनेक शतकांपासून करण्यात येतो आहे, त्यात काही प्रमाणात तथ्यही मानावे लागले. त्याच काळात जातीभेद न मानणारी वारकरी परंपरा महाराष्ट्रात रुजली, हेही महत्त्वाचे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या काळातही दरबारी राजकारणात मराठा विरु्द्ध ब्राह्मण हा वाद होताच, त्याची चर्चाही त्या त्या निमित्ताने झालेली आहे.

पेशव्यांच्या काळात वाद विस्तारला

छत्रपतींच्या गादीचे दोन वारसदार झाल्यानंतर जेव्हा पेशवेशाही उदयाला आली, त्यानंतर पुणे हे ब्राह्मणांचे प्रमुख केंद्र झाले. राज्यातील ग्रामीण तापळीवरील कुलकर्णी, देशमुखांसारखी पदेही ब्राह्मणांकडे गेली. त्या काळात हा वाद अधिक वाढला असल्याचा निष्कर्ष नक्की काढता येऊ शकतो. पानिपताच्या पराभवानंतर आणि नाना फडणवीसांच्या काळात तर होळकर, शिंदे आणि नाना फडणवीसांच्या वादालाही या वादाचा संदर्भ होता, असे सांगण्यात येते, काही कागदपत्रांत त्याचा उल्लेखही असल्याचे सांगण्यात येते. दुसऱ्या बाजीरावाने केलेल्या विलासानंतर जेव्हा इंग्रजांनी मराठा सत्ता काबीज केली, त्यानंतर तर मराठ्यांचे राज्य ब्राह्मणांनी घालवले. अशी टीका सार्वत्रिक होऊ लागली, आणि त्यातून ब्राह्मणाविषयीचा तिरस्कार इतर समाजात उत्पन्न झाला.

हे सुद्धा वाचा

ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वाद, महात्मा फुले जनक

त्यापूर्वी मराठा विरुद्ध दलित, मराठा विरुद्ध ब्राह्मण असे वाद होतेच. मात्र त्याला ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर वादाचे स्वरुप महात्मा फुलेंच्या काळात निर्माण झाले. इंग्रजांच्या राजवटीत स्त्री शिक्षण, विधवा विवाह, केशवपन पद्धतीला विरोध, या सगळ्यात त्यात्या काळातल्या कट्टर प्रतिगामी ब्राह्मण समाजाने विरोधही केला, पण त्याच पुरागोमी चळवळीत काही ब्राह्मण नेतेही या चालीरितींच्या विरोधात होते, मात्र त्याचा उल्लेख फारसा येताना दिसत नाही. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना पुण्यात त्या काळात मोठ्य़ा विरोधाला सामोरे जावे लागले.

स्वातंत्र्य चळवळीतही यावरुन वाद

स्वातंत्र्य चळवळीत पुण्यात लोकमान्य टिळकांसारख्या ब्राह्मण नेतृत्वाकडे या संघर्षाचे देशव्यापी नेतृत्व आले तरी त्यात प्रामुख्याने ब्राह्मण समाजाचाच सहभाग असल्याचे मत नोंदवले गेले. लोकमान्यांची ओळख तेल्यातांबोळ्यांचे नेते अशी असली तरी हे नेतृत्व दुर्लक्षित राहिले. वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतीकारक असो, वा लोकमान्य टिळकांच्या समर्थनातून पुढे आलेले चाफेकर बंधू, वीनायक दामोदर सावरकर असे क्रांतीकारी नेतृत्व असो ते महाराष्ट्रातील मराठा समाजाने आणि पर्यायाने ब्राह्मणेतरांनी नाकारले. त्याच काळात पुरोगामी चळवळी उभारणाऱ्या छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत ब्राह्मण समाजाच्या मनात दरी राहिली. शाहू, फुले, आंबेडकर यांची नावे सातत्याने ब्राह्मण समाजाने नाकारली अशी टीका मराठा, ब्राह्मणेतरांकडून केली जाते. तर दुसरीकडे पेशवे, विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक ही नावे मराठा नेतृत्वाकडून वगळण्यातच येतात, अशी टीका ब्राह्मणांकडून होऊ लागली. यातून समाजातील दरी वाढत गेली.

गांधी हत्येनंतर उद्रेक आणि कूळ कायदा

१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार स्वातंत्र्यचळवळीच्या अखरच्या टप्प्यातच्या वाढत गेला. त्याच काळात संघाच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले. हिंदुंचे संघटन अशी त्या संघटनेची ओळख होती, त्यातूनच पुढे भाजपा आणि पर्यायाने अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी हे नेतृत्व देशाला मिळाले. पण मराठ्यांकडून आणि इतर ब्राह्मणेतरांकडूनही ब्राह्मणांची संघटना म्हणून याला सातत्याने हिणवले गेले. महात्मा गांधीजींची हत्या झाल्यानतर विशेषता महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले. विदर्भ, मराठवाडा, . महाराष्ट्रात अनेक मोठमोठी ब्राह्मणांची घरे जाळली गेली. ते विस्थापित झाले. त्याच सुमारास कूळकायद्यामुळे त्यांच्या जमिनीही गेल्या. ब्राह्मण समाज जो आत्तापर्यंत गावात प्रभावशाली होता, त्याला पोटापाण्यासाठी गावे सोडून बाहेर पडावे लागले. यातून ब्राह्मणांचे स्थानिक राजकारण संपुष्टात आले.

ब्राह्मण आणि मराठ्यांत कतृत्वाची स्पर्धा

पेशवाई बुडाल्यानंतर ब्राह्मण समाज इंग्रजी शिक्षणाच्या मागे लागला. सामाजिक नेतृत्व, राजेशाही संपुष्टात आल्याची जाणीव पहिल्यांदा या समाजाला झाली, त्यातून ब्राह्मण समाजाने इंग्रजांची भाषा शिकून त्यांची चाकरीही सुरु केली. त्यातून नंतर समाज विखरत गेला आणि आत्ममग्न अवस्थेत राहिला. राणकारणातील या समाजाचे वर्चस्व, स्थान, काळाच्या ओघात संपुष्टात आले. मात्र सुबत्तेच्या पातळीवर तो स्थिरस्थावर झाला. वैचारिक नेतृत्व राज्यात त्या समाजाकडेच राहिले. मराठा समाजही काळाच्या प्रवाहात शेतीतून शिक्षणाकडे सरकला, आणि या वैचारिक नेतृत्वात पुन्हा मराठा आणि ब्राह्मण समाज एकमेकांसमोर उभे ठाकले. आजही समाजाच्या वैचारिक परंपरेत मग ते साहित्य, गायन, माध्यमे, वृत्तपत्र, मराठी सिनेसृष्टी, मराठी नाटके, वैचारिक चळवळी या सगळ्यांचा समावेश आहे. या सगळ्यात असलेल्या ब्राह्मण नेतृत्वाला आता प्रश्न विचारले जातायेत, यात मराठा आणि ब्राह्मणेतर समाज एकत्रित आहेत. या वादाचे पडसाद गेल्या काही काळात सातत्याने घडताना दिसत आहेत.

प्रतिकांवर हल्ले

यातूनच मग ब्राह्मण समाजाच्या प्रतिकांवर हल्ले होण्यास सुरुवात झाली. त्यात समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावांचा समावेश आहे. चुकीचा इतिहास मांडला गेला, असे सांगत इतिहास, वर्तमान याबाबत संभ्रम निर्माण करण्याचे काम सुरु झाले. काँग्रेसच्याच काळात लिहिलेल्या इतिहासाच्या पुनर्लेखनाची मागणी जोर धरु लागली आहे. प्रा. नरहर कुरुंदकर एका भाषणात म्हणाले होते, त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी हे केवळ मराठ्यांचेच राहतील, तशीच वेळ राज्यात पुन्हा उभी ठाकली आहे.

मोदींची सत्ता आल्याने ब्राह्मणांनाही चेव

संघ परिवाराच्या माध्यमातून आणीबाणीतील सहभाग आणि अयोध्या आंदोलनानंतर देशात हिंदुत्वाचं राजकारण सुरु झाले. अटलजीअडवाणींना तो आकड्यांचा खेळ जमवता आला नसला तर २०१४ नंतर नरेंद्र मोदीअमित शाहा यांच्या जोडगोळीनं तो बरोबर आत्मसात केला, आणि देशाचे राजकारण बदलले. जे सत्ता केंद्रात होते, ते परिघाबाहेर गेले. त्यात महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या रुपाने ब्राह्मणाकडे मुख्यमंत्रीपद चालून आले. त्यातून राज्यात आत्तापर्यंत सातत्याने टीका सहन करत असलेले सवर्ण सक्रिय झाल्याचे दिसू लागले. प्रत्यक्ष रस्त्यावर संघटना नसलेले सोशल मीडियावर अधिकाधिक सक्रिय आणि एकांगी होताना दिसू लागले आहेत. नुकत्याच गाडलेल्या अभिनेत्री केतकी चितळे वादग्रस्त पोस्ट प्रकरणामागेही मराठा विरुद्ध ब्राह्मणवादाचीच पार्श्वभूमी आहे. फडणवीस सत्तेत आल्यानंतर त्यांनी आणि भाजपाने राज्यातील मराठा समाजाचे नेतृत्व असलेल्या छत्रपतींना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. यातूनच उदयनराजे आणि संभाजीराजे राज्यसभेचे खासदार झाले. त्यातही उदयनराजेंचा पराभव करण्यात राष्ट्रवादीने पुढाकार घेतला, हेही विशेष. कोरेगाव भीमा प्रकरणातही संभाजी भिडेंबाबत राष्ट्रवादी आणि पवारांनी घेतलेली भूमिका ही ब्राह्मणविरोधी असल्याचेच मानले गेले.

पवारांची भूमिका काय

या सगळ्या स्वातंत्र्योत्तर कालखंडात शरद पवारांनी काँग्रेसचे राज्यात दीर्घकालीन नेतृत्व केले आहे. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर, गाजलेले जेम्स लेन प्रकरण, भाडांरकर संस्थेत झालेली तोडफोड असो, दादोजी कोंडदेव पुतळा हटवणे असो वा शिवशाहीर बाबाहेब पुरंदरेंच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला झालेला विरोध असो, या सगळ्यात शरद पवारांची त्या विरोध करणाऱ्या संघटनांना पाठिंबा असल्याचेच वेळोवेळी दिसून आले आहे. यातूनच पवारांची प्रतिमा ही मराठ्यांचे नेते आणि ब्राह्मद्वेष्टे अशी झाली आहे. पवारांनी ब्राह्मण संघटनांची बैठक बोलावल्यानंतर, बरे झाले आता आठवण झाली, ही फडणवीसांची प्रतिक्रिया याबाबत बोलकी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकत्याच एका सभेत पहिल्यांदाच जातीयवादी राजकारण पवार करत असल्याचा आरोप जाहीरपणे केला.

मराठाब्राह्मण समाजात संवादाची गरज

गेल्या काही वर्षांत राज्यातील वातावरण राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या गढूळ होत चालले आहे. यात मराठा आणि ब्राह्मण समाज हे राज्यात वैचारिक नेतृत्व करणारे दोन महत्त्वाचे घटक आहेत. या दोन्ही घटकांत सुसंवाद राहिल्यास, हा आंतरिक द्वेष कमी होऊ शकतो. पर्यायाने समाजातही शांतता निर्माण होऊ शकते. शरद पवार यासाठी प्रयत्न करीत आहेत, ही नक्कीच स्वागतार्ह बाब मानायला हवी.

काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं
काहीतरी वाटू द्या, काँग्रेसच्या नेत्या भडकल्या, भाजप खासदाराला सुनावलं.
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप
कराडकडून पतीवर हल्ला, तक्रार करायला गेली पण.., गित्तेच्या पत्नीचा आरोप.
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?
Trump Tariff : भारतीय शेअर मार्केटमध्ये ब्लॅक मंडे, नेमकं नुकसान कशाच?.
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप
प्रश्नांची उत्तर न देताच मंगेशकर रूग्णालयाच्या पत्रकार परिषदचं पॅकअप.
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल
डिपॉझिट मागण्याची पद्धत नाही पण..., मंगेशकर रूग्णालयानं स्पष्ट सांगितल.
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'
कुणाल कामराचं 'बुक माय शो'ला पत्र, 'माझे शो काढायचे असतील तर...'.
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी...
LPG सह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले, आता 803 रूपयांऐवजी....
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं
साखर कारखाना निवडणुकीवरून रोहिणी खडसेंनी भाजपला डिवचलं.
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक
कोकाटेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण, मंगेशकर रूग्णालयातील डॉ घैसासांचा राजीनामा.