धनगर समाजाला आरक्षणाच्या दिलेल्या शब्दाचं काय झालं?; अनिल देशमुख यांचा फडणवीस यांना सवाल
अजितदादांना अदृश्य शक्तीच्या कृपेने पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. आता त्यांनी काम करावे, पवार साहेबांवर बोलु नयेत. ते कुटुंब प्रमुख आहेत. त्यांच्यावर बोलायला अदृश्य शक्ती भाग पाडत आहे. परंतू पवारांवर केलेली टीका महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही अशीही टीका अनिल देशमुख् यांनी केली आहे.
नागपूर | 17 फेब्रुवारी 2024 : एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापले असतानाच आता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता धनगर समाजाला सर्वोच्च न्यायालयात जाण्यावाचून पर्याय राहीलेला नाही. यावरुन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी धनगर समाजाला आरक्षणाच्या दिलेल्या शब्दाचं काय झाले असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
धनगर समाजाने आपला अनुसूचित जातीत ( एसटी ) समावेश करावा अशी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. तसेच धनगर आणि धनगड हे एकच नसल्याचे देखील कोर्टाने स्पष्ट केले आहे. सध्या धनगर समाजाला एनटी ( भटक्या जमाती ) प्रवर्गातून साडे तीन टक्क्यांचे आरक्षण आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण 7 टक्के झाले असते. परंतू मुंबई उच्च न्यायालयाने यासंर्दभातील याचिका फेटाळल्या आहेत. साल 2013 मध्ये देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना बारामतीत धनगर समाजाचे मोठे आंदोलन झाले होते. त्यावेळेस फडणवीस यांनी सरकार आल्यावर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळलेले नाही. आता ते एक शब्द बोलायला तयार नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे.
तुम्ही काम करा, पवारांवर काय बोलता ?
राष्ट्रवादी आमदाराच्या अपात्र प्रकरण आणि पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्याच्या प्रकरणावर बोलताना अदृश्य शक्तीच्या मदतीने तुम्हाला पक्ष आणि चुन्ह मिळाले असल्याचे राष्ट्रवादी पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. आता तुम्ही काम करा, पवार साहेबांवर काय बोलता? या पवार साहेबांनी तुम्हाला मोठे केले आहे. अदृश्य शक्तीच्या दबावाखाली तुम्ही बोलत आहात. त्यामुळे ज्यांनी मोठं केले त्यांच्याबद्दल बोलू नये अशी विनंती आपण अजितदादांना करीत असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र खपवून घेणार नाही
सुप्रिया सुळे यांच्यावर अजितदादांनी टीका केली आहे. त्याबद्दलही अनिल देशमुख म्हणाले की सुप्रियाताई लोकांच्या संपर्कात असतात. संसदेत त्या आपले भाषण करतात. इतकं चांगलं काम त्या करीत असताना बहिणीबद्दल असं वक्तव्य करणे योग्य नसल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. संपूर्ण पवार कुटुंबाचे प्रमुख पवार साहेब आहेत. अशा स्थितीत दादांचे वक्तव्यं योग्य नाहीत. दादांना हे कसं काही कळत नाही. पवार साहेबांविरोधातील वक्तव्यं महाराष्ट्र खपवून घेत नाही असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.