महाराष्ट्रात चाललंय काय? धनगर, ओबीसी, तरुणाई रस्त्यावर? कुठे झाले आंदोलन?
मराठा समाजाचे आंदोलन काही काळापुरते शिथिल ठेवण्यात आले आहे. पण, राज्यात ओबीसी, धनगर समाजाने आंदोलन सुरु केले आहे. तर सरकारने काढलेल्या कंत्राटी कामगार भरतीच्या निर्णयाविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.
मुंबई : 18 सप्टेंबर 2023 | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १७ दिवस उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपोषणाची आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला. तसेच, ठोस निर्णय घेण्यासाठी सरकारने एक महिन्याचा कालावधी मागितला. अखेर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण संपले. पण, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी संघर्षाचे हत्यार उपसले. दुसरीकडे धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठीही नगरच्या चौंडी येथे उपोषण करण्यात येत आहे. तर, शासनाच्या कंत्राटी भरतीच्या निर्णयाविरोधात राज्यातील तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.
नागपूर : संविधान चौकात भव्य ओबीसी मोर्चा काढण्यात आला. डोक्यावर लाल रंगाची पगडी, हातात पिवळा झेंडा आणि दुसऱ्या हातात ‘आम्ही ओबीसी आरक्षणाचे रक्षक” असे फलक घेऊन ओबीसी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशा लेखी आश्वासनाची मागणी या मोर्चात करण्यात आली.
गोंदिया : ओबीसी समाजाने जन आक्रोश महाआंदोलन केले. विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या. गोंदिया विधानसभेचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या चाबी संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
यवतमाळ : विविध ओबीसी आंदोलन कृती समिती आणि महात्मा फुले समता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये धरणे आंदोलन, मोर्चा आणि निदर्शने करण्यात आली. यवतमाळच्या महात्मा फुले चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात आली.
अहमदनगर : विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.
पंढरपूरमध्ये धनगर समाज आक्रमक
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक झाला. 24 सप्टेंबरपासून पंढरपुरात चक्काजाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला. पंढरपूरमध्ये धनगर समाजाची बैठक पार पडली यावेळी हा निर्णय घेण्यात आला. साखळी पद्धतीने अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी धनगर समाज येत्या काळात आंदोलन करणार आहे असे धनगर समाजाचे नेते पंकज देवकाते यांनी सांगितले.
कंत्राटी नोकर भरती आदेशाची होळी
नाशिक : राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती करण्याचे संकेत दिले यामुळे तरुणांमध्ये असंतोष पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने याचा निषेध करत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या आदेशाची होळी केली. राज्य सरकार हा निर्णय घेणार असेल तर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना देखील कंत्राटी पद्धतीने नेमावे असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष नितीन निगळ यांनी लगावला.
धुळे : धुळ्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. शिंदे फडणवीस सरकारच्या या निर्णयामुळे तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. ठराविक खाजगी एजन्सीचा फायदा करून देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा आरोप करण्यात आला.
सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटातर्फे निदर्शने करण्यात आली. कंत्राटी कामगार धोरण पद्धत महाराष्ट्रातून रद्द करा. राज्य सरकारने शासकीय नोकरीत कंत्राटी पद्धत सुरु करण्याचा घाट घातलाय तो बंद करावा. सरकारने या भरतीमध्ये आरक्षणाचा विषय ठेवला नाही त्यामुळे ही भरती असंवैधानिक आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय वाकसे यांनी केला.
जळगाव : शासन निर्णयाची होळी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जळगाव महामार्गावर रास्तारोको केले. कंत्राटी भरतीचा हा निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
शेकडो कार्यकत्यांसह महिला रस्त्यावर
इंदापूर : जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खूपसे यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर आरोप केला होता. त्याचा निषेध करत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने अतुल खुपसे यांच्याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता.