ड्रग्स माफिया ललित पाटील याचे नाशिक कनेक्शन? शिंदे पळसे गावात काय घडत होतं?
नाशिक या तीर्थक्षेत्राला ड्रग्सचा विळखा पडलाय. यावरून राजकारण सुरु झालंय. पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला ललित पाटील याचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. पण, आमदार देवयानी फरांदे यांनी माहिती देऊनही पोलिसांनी कारवाई का केली नाही? हा प्रश्न आहे.
चंदन पुजाधिकारी, नाशिक : 10 ऑक्टोबर 2023 | तीर्थक्षेत्र आणि मंदिरांचं शहर म्हणून नाशिकची जगभरात ओळख. पण, याच पुण्यनगरीला सध्या ड्रग्सचा विळखा पडलाय. गेल्या आठवड्याभरात मुंबई आणि नाशिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो किलो एमडी ड्रग्सचा साठा पकडण्यात आलाय. इतकचं नाही तर नाशिकमध्ये ड्रग्स तयार करणाऱ्या एका फॅक्टरीला मुंबई पोलिसांनी उध्वस्त केलंय. धक्कादायक म्हणजे स्थानिक आमदारांनी सहा महिन्यांपूर्वी ड्रग्ज माफियांचे फोन नंबर पोलिसांना दिले. पण, नाशिक पोलिसांच्या नाकाखालून मुंबई पोलिसांनी नाशिकमध्ये येऊन कारवाई केली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढलंय. त्यामुळे उडत्या पंजाब प्रमाणे हे शहरही उडतं नाशिक होण्याच्या मार्गावर आहे.
नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिकचा उडता पंजाब झाला हे सभागृहात सांगितलं होतं, असं म्हटलं. पोलिसांना 6 महिन्यांपूर्वीचं सगळ्या ड्रग डीलर्सचे नंबर दिले. नाशिकमध्ये ड्रग्सचा कारखाना सुरू आहे हे सभागृहात सांगितलं. पोलिसांनी कारवाई का केली नाही याचं उत्तर द्यावे. नाशिकमध्ये पोलिसच ड्रगच्या अधीन आहेत हे मला कळालं, असे त्या म्हणाल्या.
शाळा, महाविद्यालय, संपूर्ण शहरात ड्रग्सचा बाजार सुरू आहे. मात्र, पोलीस काय करत आहेत. ड्रग्स हँडलरचा सिडीआर का तपासला नाही. शहरात एम. डी ड्रग्समुळे अनेक खून आणि आत्महत्या झाल्या. मुंबईचे पोलीस नाशिकमध्ये येऊन कारवाई करतात तर नाशिक पोलिसांना उत्तर द्यावे लागेल, असे त्या म्हणाल्यात.
नाशिक शहरांमधल्या या ड्रग्स माफियावरून राजकारण सुरू झालंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमडी ड्रग्सच्या या रॅकेटमध्ये स्थानिक आमदारांचा सहभाग असल्याचा धक्कादायक आरोप केलाय. या आमदाराचे नाव आपण सभागृहात संपूर्ण राज्यासमोर पुराव्यासह सांगणारा असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
आमदार देवयानी फरांदे यांनी ‘नाना, या विषयावर राजकारण करू नका. आपल्याला आमदारांचे नाव माहिती असेल तर जाहीर करा. हा नाशिकच्या तरुण भविष्याचा प्रश्न, यावर राजकारण करू नका’, असं आवाहन केलंय. तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी या आरोपांत काहीही तथ्य नाही. नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांसमोर आमदारांचं नाव घोषित करावं. अन्यथा यावरून या प्रकरणाचे गांभीर्य कमी करू नये असा इशारा दिलाय.
ड्रग्स माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. त्यानंतर हे नाशिक कनेक्शन समोर आलंय. नाशिकच्या शिंदे पळसे गावाजवळ असलेल्या ड्रग्स कारखान्याला उध्वस्त करण्यात आलं. त्यावेळी हा कारखाना ड्रग माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याचा असल्याचं उघडकीस आलं. पण, अनेक वर्षांपासून सुरू असलेला शिंदे गाव परिसरातील हा उद्योग पोलिसांना कसा माहित नाही हा प्रश्न आहेच. शिवाय ड्रग्सच्या मास्टर माईंडला कधी अटक होणार हा नाशिककरांचा सवाल आहे.
नाशिकच्या शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुण या विळख्यात अडकल्याचं समोर येतंय. शहरातील उच्चभ्रू वस्तीपासून ते गल्लीबोळापर्यंत एमडी ड्रग्सचा सप्लाय राजरोसपणे आणि प्रोफेशनल पद्धतीने केला जातोय. विशेष म्हणजे अनेक महाविद्यालयीन तरुणी देखील या जाळ्यात सापडल्यात.
किती आहे MD ड्रग्स ची किंमत ?
जिथे गांजा 100 ते 200 प्रति पुडी आणि भांग 20 ते 100 रुपये प्रति गोळी मिळते तिथे MD ड्रग हे 1500 ते 2500 प्रति ग्राम एवढे महाग मिळते. हे ड्रग महाग असल्याने त्या व्यसनामुळे अनेक तरुण कर्जबाजारी झालेत. अनेकांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलीय. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या तरुणांच्या हत्या आणि आत्महत्या यामागे MD ड्रग्स कनेक्शन असल्याचं समोर आलंय.
नाशिकमध्ये कुठे सुरू आहे सप्लाय ?
वडाळा गाव, वडाळा नाका, अशोका मार्ग, तपोवन, अमृतधाम, आडगाव परिसर, शिंदे गाव, मुक्तीधाम, रेल्वे स्टेशन परिसर, सैलानी बाबा रोड, एकलहरे परिसर, म्हाडा वसाहत चुंचाळे, पाथर्डी गाव परिसर तसेच शहरातील महाविद्यालयाबाहेरील टपऱ्या, कॅफे इथे यांचे व्यवहार होतात.