Sangli : ग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव काय? अन् म्हणे डिजिटल इंडिया..!
ग्रामीण भागात मूलभूत सोई-सुविधा पोहचल्या आहेत का नाहीत हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. सोई-सुविधांअभावी हजारो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत.
सांगली : काळाच्या ओघात शिक्षण (Education) पद्धतीमध्ये बदल होत आहे. शिवाय गेल्या दोन वर्षात होत असलेला बदल अनुभवयासही मिळाला पण तो शहरी विद्यार्थ्यांपूरताच मर्यादित राहिला. शहरी भागात शिक्षण क्षेत्रात डिजिटलाइजेशन (Digital) होईलही पण ग्रामीण भागाचे काय? असा प्रश्न कोल्हापुरातल्या (Kolhapur) अंबाई धनगरवाडी येथील विद्यार्थ्यांची व्यथा पाहिल्यावर नक्कीच पडेल. येथील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी तब्बल 21 किमीचा प्रवास करावा लागत आहे. या धनगरवाडीत अजूनही एसटी ही पोहचलेलीच नाही. त्यामुळे गावच्या 30 विद्यार्थ्यांना दररोज 4 तास पायपीट केल्यानंतर ज्ञानार्जनाचे धडे मिळतात हे आहे वास्तव.
कोरोना काळात सर्वाधिक परिणाम झाला तो शिक्षण क्षेत्रावर. आता ऑफलाईन पद्धतीनचे शाळा सुरु झाल्या आहेत. पण धनगरवाडीतील विद्यार्थ्यांना या ऑफलाईन पद्धतीनेही शिक्षण घेण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते.
देशात यंदा स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले आहे. मात्र, हे करीत असताना ग्रामीण भागात मूलभूत सोई-सुविधा पोहचल्या आहेत का नाहीत हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. सोई-सुविधांअभावी हजारो विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाई धनगरवाडी ते सांगली जिल्ह्यातील शिराळा हे 21 किमीचे अंतर पायी पार केल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळते. आजच्या युगात शिक्षणाशिवाय काहीच नाही असे म्हटले जात असले तरी शिक्षण एवढे असह्य असते का असाच सवाल पडत आहे.
अंबाई धनगरवाड्यातील 30 विद्यार्थी हे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी सांगलीच्या वापणावती हुतात्मा नरग येथे 10 किमी अंतर पायपीट करुन येतात. शिवाय हे एक दिवसाचे नाही. शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांची सोय करण्याची मागणी होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अंबाई धनगरवाडी येथे रस्त्याचे डांबरीकरणही झाले आहे. त्यामुळे एसटी वाहतूकीस कोणतीही अडचण नाही. पण या वाडीच्या रस्त्यावरुन अद्यापही बस ही धावलेलीच नाही. त्यामुळे विद्यार्थांचे स्वप्नही साकार होणार की नाही असे प्रश्न निर्माण होत आहेत.