कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असं सांगणारे भुजबळ कोण?; शिंदे गटाच्या आमदाराचा सवाल; प्रमाणपत्राच्या मुद्दयावरून महायुतीत वाद?
कुणबी प्रमाणपत्रांवर ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्यास सरकार मधील मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटला आहे. आता सरकारमधीलच एका आमदाराने थेट भुजबळांवर टिका करीत कुणबी प्रमाणपत्र वाटू नका असं म्हणणारे भुजबळ कोण ? असा सवाल केल्याने महायुतीत कुणबी प्रमाणपत्रांवरुन वाद निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : जालनातील ओबीसी यल्गार परिषदेत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट कुणबी प्रमाणपत्रांवर आरक्षण देण्याच्या मागणीवरुन मोठी टिका केली होती. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्यानंतर जरांगे पाटील यांनी भुजबळांवर टिका केली होती. आता महायुतीच्या सरकारमधील सहभागी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांवर टिका करीत नोंदी सापडल्यावर कुणबी प्रमाणपत्र देऊ नका सांगणारे भुजबळ कोण ? असा सवाल केला आहे. त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांतचे जुंपल्याचे चित्र आहे.
मराठ्यांच्या कुणबी नोंदी जर सापडत असतील तर सरकारने त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. त्यांचा 70 वर्षांचा बॅकलॉग भरुन काढायला पाहीजे. नोंदी सापडल्यावर त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका असं म्हणणारे भुजबळ कोण ? त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे. मराठ्यांच्या आता 30 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. उद्या 50 लाख किंवा 1 कोटीपण सापडतील. त्या सर्व नोंदणी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे गरजेचे असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा थेट नाव न घेता सोशल मिडीयावर त्यांच्यावर ‘पनवती’ अशी टिका टिपण्णी होत असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला असून त्यावरुन वादंग सुरु झाला आहे. यावर प्रतिक्रीया देताना संजय गायकवाड यांनी राहुल गांधी आता पनवती बोलत आहेत. मग हेच राहुल गांधी आणि त्यांची बहिण प्रियंका गांधी 2004 साली पाकिस्तानमध्ये जाऊन मॅच का बघत होते ? त्याचं उत्तर त्यांनी द्यावं असा सवाल त्यांनी केला आहे. जुन्या पेंशन योजनेच्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत. त्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माझा पाठींबा आहे. राज्याची आर्थिक स्थिती आता चांगली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बागेश्वर बाबांना भेटण्यात गैर काय ?
बागेश्वर बाबांवर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी बागेश्वर बाबांना भेटले तर त्यात गैर काय आहे.? बागेश्वर बाबांना आपली चूक महाराष्ट्रात येऊन कळली आहे. त्यामुळे त्यांनी देहूला जाऊन संत तुकारामांचे दर्शन घेतले आहे असेही आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.