लाडक्या बहिणींच्या मनातील मुख्यमंत्री कोण फडणवीस की शिंदे? ग्राऊंड रिपोर्ट काय?
येत्या पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये. या सर्व पार्श्वभूमीवर आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जळगाव, किशोर पाटील, प्रतिनिधी : येत्या पाच तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. मात्र शपथविधी आता अवघ्या दोन दिवसांवर आला असताना देखील महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये. विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 जागांवर विजय मिळवत भाजपच महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरला आहे, त्यामुळे नवा मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र अजून नावाची घोषणा बाकी आहे.
दरम्यान मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे. राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण व्हावेत देवेंद्र फडणवीस की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना संधी मिळावी याबाबत जवळगावच्या लाडक्या बहिणींकडून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
नेमकं काय म्हणाल्या लाडक्या बहिणी?
एकनाथ शिंदे हेच आमचे लाडके भाऊ झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं अशी प्रतिक्रिया एका लाडक्या बहिणीनं व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत होते म्हणूनच भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, त्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्री करा. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही तर वाईट वाटेल, अशा काही प्रतिक्रिया लाडक्या बहिणींनी यावेळी बोलताना दिल्या आहेत. मात्र काही लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे.
नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला
नव्या सरकारचा शपथविधी सोहळा हा येत्या पाच डिसेंबरला होणार आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या महासोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला 22 राज्यातील मुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष अमंत्रण देण्यात आलं आहे.