राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं की…

| Updated on: Jul 03, 2023 | 6:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर आता पक्ष कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार गटाने दावा ठोकला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं की...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कोण? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलं की...
Follow us on

मुंबई : राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी वेगळी चूल मांडल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. दोन गटात विभागणी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा आहे? यावरून वाद सुरु झाला आहे. शरद पवार आणि अजित पवार असं दोघेही पक्षावर दावा ठोकत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. असं असताना अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह पत्रकार परिषद घेतली आणि त्यात पक्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला. त्यावेळी त्यांनी त्या प्रश्नाला रोखठोकपणे उत्तर दिलं.

“राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे तुम्ही विसरलात का? त्या संदर्भात काल निर्णय केलेला आहे. काल प्रफुल पटेल साहेब बोलले. मी सुद्धा 1999 साली पक्षाची स्थापना झाल्यापासून भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कामाला सुरुवात केली. आजपर्यंतच काम उभ्या महाराष्टाने पाहिलं आहे. प्रफुल पटेल यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांची निवड केली आहे. ” असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार यांना सुप्रिया सुळे यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावरही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं.”हकालपट्टी करण्यासाठी आमचा पक्ष काढलेला नाही. आम्ही बेरेजचं राजकारण करतो आणि पक्ष वाढवतो.आम्ही इथे काय हकालपट्टी करायला बसलो आहोत का?”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी बंड करणाऱ्यांना जागा दाखवली जाईल असं म्हंटलं होतं, त्या प्रश्नावरही अजित पवार यांनी उत्तर दिलं. “आपल्या राज्यात आपल्या देशात पक्षाबाबत असे काही प्रश्न निर्माण झाले तर त्या संदर्भातला अधिकार कुणाला आहे, तर तो निवडणूक आयोगाला आहे. निवडणूक तिथे सांगतो पक्ष कोणाकडे आहे, चिन्ह कोणाकडे आहे.त्यासंदर्भात आपल्याला तिथे कळेल.आम्ही म्हणजे पक्ष आणि त्याप्रमाणेच आम्ही पुढे चाललो आहोत.”

पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी, अमोल मिटकरी हे उपस्थित होते.