उस्मानाबादमध्ये महाविकास आघाडीत संभ्रम, राणा पाटील यांच्यामुळे भाजप-राष्ट्रवादी एकत्र
राज्यात महाविकास आघाडीचा बोलबाला जरी असला तरी उस्मानाबाद जिल्हा परिषदेत मात्र चारही पक्षात गोंधळाची परिस्थिती आहे. त्यामुळे सत्ता कोण स्थापन करणार? हे पाहणे गरजेचे आहे.
उस्मानाबाद : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र संभ्रम कायम आहे. राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेले आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलली आहेत. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी राणा पाटील आणि शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी 28 हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 26 , शिवसेना 11, काँग्रेस 13, भारतीय जनता पक्ष 4 आणि अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची शिवसेनेच्या 2 बंडखोर सदस्यांच्या पाठिंब्याने एकत्र सत्ता असून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद हे राष्ट्रवादीकडे आहे तर भाजपकडे 2 सभापती पदे आहेत.
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना असे एकत्र झाल्यास महाविकास आघाडीची सहज सत्ता येऊ शकते. मात्र राष्ट्रवादीतील गळती, शिवसेना-राष्ट्रवादी नेत्यांमधील वादामुळे आणि असमन्वयामुळे समीकरण जुळणे कठीण आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड 8 जानेवारी रोजी दुपारी 2 नंतर होणार असून अध्यक्षपद हे अनुसूचित जातीतील महिलेला आरक्षित आहे. राष्ट्रवादीचे 26 सदस्य, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील हे आमदार झाल्याने एक जागा रिक्त झाली असून सेनेचे संख्याबळ 10 झाले आहे. काँग्रेसचे 13 असे पक्षीय बलाबल आहे.
राष्ट्रवादीचे राणाजगजितसिंह पाटील हे भाजपात गेल्याने त्यांच्या बाजूने 16 समर्थक जिल्हा परिषद सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. मात्र जिल्हा परिषदेचा एक स्वतंत्र बंडखोर गट निर्माण करण्यासाठी किमान 18 सदस्य फुटणे गरजेचे आहे. मात्र तशी परिस्थिती नाही. त्यामुळे राजकीय सोयीसाठी राणा पाटील हे त्यांचे सर्मथक सदस्य कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच ठेवून आपल्या समर्थकांच्या गळ्यात अध्यक्षपदाची विजयाची माळ टाकून कारभारी बनण्याचा त्यांचा मनसुबा आहे.
कागदोपत्री राष्ट्रवादीला संभाव्य विजय मिळाला तरी ते पदाधिकारी भाजपचे म्हणूनच वावरणार आहेत. यामुळे जिल्हा परिषदेवर सत्ता भाजपची की राष्ट्रवादीची का एकट्या राणा पाटलांची? हा संभ्रम कायम राहणार आहे. तर राणा पाटील यांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीची मोट बांधत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राणा पाटील हे भाजपमध्ये गेल्याने राष्ट्र्वादीच्या शिल्लक राहिलेल्या सदस्यांचे नेतृत्व माजी आमदार राहुल मोटे यांच्याकडे गेले आहे. शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केल्याने त्यांच्यात सध्या टोकाचे वितुष्ट आहे. त्यातच सावंत यांनी राष्ट्रवादीचे सदस्य फोडून भूम आणि परंडा पंचायत समिती मोटे यांच्या ताब्यातून घेतली. राहुल मोटे गटाला सोबत घेतल्याशिवाय जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण यशस्वी करणे शक्य नाही. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये समन्वय चांगला असला तरी राष्ट्रवादीच्या राहुल मोटे यांची भूमिका सध्या गुलदस्त्यात आहे.