मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका का केली?; छगन भुजबळ यांनी सांगितलेलं कारण काय?; म्हणाले, दोन महिने झाले…
आपण कुणबीविरोधात काहीही बोललो नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. त्याचं संरक्षण होईल अशीच आपली भूमिका आहे. मराठा आरक्षण वेगळं द्या, याला कोणाचाच विरोध नाही. राज्याचा मंत्री म्हणून आणि एक नेता म्हणून आम्हाला पेटवापेटवी नको आहे. पण...
उमेश पारीक, नाशिक | 20 नोव्हेंबर 2023 : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासूनची भूमिका आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर आरक्षण देणे योग्य नाही अशी आमची मागणी आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यात 14 सभा घेतल्या आहे. त्यावेळी माझ्याविरोधात गैरउद्गार काढले आहेत. मी काही बोललो नाही, शांत होतो. परंतू माझी एकच सभा झाली आहे. माझं भाषण मी अंबडला केले. येवल्यात बसून केले नाही. भुजबळाचं नाव घेऊन अश्लील एसएमएस आणि शिव्या का घातल्या गेल्या. त्यामुळे विरोध करणे गरजेचा होता, तो आपण केल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
आपण कुणबीविरोधात काहीही बोललो नाही. त्यांच्यावर अन्याय होणार नाही. त्याचं संरक्षण होईल अशीच आपली भूमिका आहे. मराठा आरक्षण वेगळं द्या, याला कोणाचाच विरोध नाही. राज्याचा मंत्री म्हणून आणि एक नेता म्हणून आम्हाला पेटवापेटवी नको आहे. आमच्याकडून काही जाळलं गेलं नाही. सुरुवात ज्यांनी केली त्यांनी बोलावं असे छगन भुजबळ यांनी सांगितले. आपण जरांगे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. पण संपर्क झाला नाही. माझ्या कुठच्या भूमिकेला जरांगेचं समर्थन नाही हे मला जाणून घ्यायचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
…पण लढा सुरुच ठेवणार
बीडमध्ये घर आणि हॉटेल जाळल्यानंतर जरांगे यांनी म्हटलं ते आमचे लोक नाहीत आणि नंतर म्हणतात की त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. आता त्यांच्या रात्री बेरात्री सभा सुरु आहेत. गावबंदी केली, जाळपोळ केली या कृत्याने दोन समाजात वितुष्ट येते असे वाटले नाही का ? मी दोन महिन्यांपासून शिव्या ऐकतोय. त्यामुळे आपल्या पद्धतीने विरोध केला आहे असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. आपण एकटा तर एकटा पण लढा सुरुच ठेववा लागणार. ओबीसीचं काम करीत रहाणार. यश मिळेल न मिळेल. जे नवीन जुने सोबत येतील त्यांना सोबत ओबीसींचा लढा कायम सुरु ठेवू असेही भुजबळ यांनी सांगितले आहे.