शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला?, काय ठेवली होती अट?; अजित पवार यांच्याकडून वस्त्रहरण सुरूच
मी अर्थसंकल्प मांडणार आहे. राज्याला चांगलं देण्याचं काम करेन. ही निवडणूक महत्त्वाची आहे. पूर्ण ताकदीने उतरायचं आहे. बूथ कमिटीच काम महत्त्वाचं आहे. ज्यांना जमणार नाही त्यानी सांगावं. शेवटी सगळ्यांना विचार स्वातंत्र्य आहे. जागरूकतेने काम कराव लागणार आहे. डोळ्यात तेल घालून काम करायच आहे. आपला जो अधिकृत उमेदवार असेल त्याला बळ दिलं पाहिजे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 16 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना कोंडीत पकडले आहे. शरद पवार यांच्याबाबतचा अजितदादांनी आणखी एक खुलासा करून काकांचंच वस्त्रहरण केलं आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला होता? राजीनामा देताना काय अट ठेवली होती? याबाबतचा मोठा गौप्यस्फोटच अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार येथील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. मी राजीनामा देतो. सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हा आम्ही ते मान्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी न सांगता राजीनामा दिला. पण चार दिवसात काय चक्र फिरली काय माहीत, त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद आणि पक्षाचा ताबा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादांनी शरद पवार यांच्यावर सार्वजनिक कार्यक्रमातून टीका केली आहे.
असा प्रसंग यायला नको होता
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष वाढवण्याचं आवाहन केलं. बूथ कमिटी मेळावा घ्या. काम करत असताना ज्येष्ठ पिढ्या पाहिल्या आहेत. मला पण कमी वयात काम करण्याची संधी मिळाली. मला सुरुवातीला कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. 1987 साली कामाला सुरुवात केली. तरुण वर्ग एकत्र आला आणि प्रयत्न केला. आपण प्रेम दिलं, वरिष्ठांनी संधी दिली आणि पक्षाने पदं दिली. काम करता करता अनुभव येत गेला. परंतु, आता स्थिती बदलली आहे. असा प्रसंग उद्भवायला नको होता, असं अजितदादा म्हणाले.
तर मी मुख्यमंत्री झालो नसतो
देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला पाहिजे असं आम्ही वरिष्ठांना सांगितलं. त्यावेळी आपल्याला उपमुख्यमंत्रीपद घ्यायचं असं वरिष्ठांनी सांगितलं होतं, असं सांगतानाच काँग्रेससोबत असताना राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी आली होती. तेव्हा मुख्यमंत्रीपद आलं असतं तर मी मुख्यमंत्री झालो नसतो. आरआर पाटील किंवा छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते. कारण हे दोन्ही नेते वरिष्ठ होते, असं अजितदादा म्हणाले.
आमदार थांबायला तयार नव्हते
2010ला मला उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. लोकशाहीत बहुसंख्येला महत्त्व असतं, असं सांगतानाच ठाकरे सरकारवरही त्यांनी भाष्ट केलं. उद्धव ठाकरे सरकार जाणार होतं. सर्व आमदारांनी सह्या केल्या होत्या. आमदार थांबायला तयार नव्हते. इकडे भाजपची आम्हाला सोबत घेण्याची तयारी होती. पण वरिष्ठ निर्णयच घेत नव्हते. आम्ही पुन्हा एकत्र आलो. बहुजन समाजासाठी निर्णय घेतला पाहिजे हे ठरवलं, असंही त्यांनी स्पष्ट केलं.