2017 साली शिवसेना जातीयवादी होती, मग दोन वर्षांत मविआसोबत का गेलात ? अजित पवारांचा थेट सवाल
मुंबईत अजित पवार गटाच्या बैठकीत शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या बैठकीत अजित पवार यांनी मनातील खदखद व्यक्त करत शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.
मुंबई : 2017 साली तुम्हाला शिवसेना (shivsena) जातीयवादी वाटत होती, मग दोन वर्षात महाराष्ट्र विकास आघाडी सोबत का गेलात ? दोन वर्षांत अशी काय परिस्थिती बदलली की 2019 मध्ये तुम्ही त्याच शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केलीत, असा खडा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांनी विचारला. मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांवर थेट निशाणा साधला. त्यांच्या विधानामुळे खळबळ उडाली असली तरी शरद पवार ( Sharad Pawar) हे आजही माझं दैवत आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
२०१७ साली शरद पवारांसाठी शिवसेना जातीयवादी होती, मग २०१९ ला मविसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यानंतर अचानक काय झालं की शिवसेना जातीयवादी राहिला नाही. अन् भाजप जातीयवादी झाला. असं चालत नाही, असंही अजित पवार म्हणाले. या बैठकीत अजित पवारांनी मनातील खदखद व्यक्त करत अनेक विषयांवर त्यांचे मत मांडले.
अजित पवारांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
1) जनतेसमोर मला वारंवार व्हिलन का केलं जातं, असा सवाल अजित पवारांना विचारला आहे.
2) आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, ही माझी चूक आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय
3) यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या धोरणांवरही टीका केली. पवारांच्या धोरणांमुळेच आत्तापर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला नसल्याचे टीकास्त्र अजित पवारांनी सोडले.
4) राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची संधी शरद पवारांनी ४ वेळा गमावली, असेही अजित पवार म्हणाले.
5) २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षासोबत जायचं नव्हतं तर मग फडणवीसांच्या शपथविधीला का पाठवलं ? , असा सवाल अजित पवारांनी विचारला.
6) २०१७ साली शरद पवारांसाठी शिवसेना जातीयवादी होती, मग २०१९ ला मविसोबत जाण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न त्यांनी विचारला.
7) २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षासोबत ५ वेळा बैठका झाल्या, मात्र देवेंद्र फडणवीसांसह मला गप्प रहायला सांगितलं गेलं, ते का, असा सवाल त्यांनी विचारला.
8) शिंदेच्या बंडावेळी भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांच्या सह्यांसह पत्राचा ड्राफ्ट तयार होता. मात्र तेव्हा शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली. आमचं मत मान्य केलं नाही , असं देखील अजित पवार म्हणाले.
9) राज्याचा मुख्यमंत्री व्हावं ही माझी मनापासून इच्छा आहे, किती दिवस उपमुख्यमंत्री रहायचं, असंही अजित पवार यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. मला उपमुख्यमंत्री केलं. मी कधी हूँ की चूँ केलं नाही. कोरोना काळात काम केलं. त्यात हलगर्जीपणा केला नाही. त्यानंतर शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली. आम्ही आमच्या प्रमुखांना सांगितलं काही तरी वेगळं घडतंय. उद्धव ठाकरेंना सांगितलं काही तरी घडतंय. पण कुणी लक्ष दिलं नाही. एकनाथ शिंदे यांनी वेगळा निर्णय घेतला. ते गुवाहाटीला गेले. त्यावेळी आम्ही 51 आमदारांनी भाजपसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण वरिष्ठांनी निर्णय घेतला नाही, असं ते म्हणाले.