खातेवाटप का रखडले? ‘अर्थ’कारणासाठी राष्ट्रवादीला हवीत ‘ही’ तीन महत्वाची खाती?
मध्यरात्रीच्या चर्चेनंतरही हा पेच सुटत नसल्याने अखेर अजित पवार यांनी आज दिल्ली हायकमांडकडे धाव घेतली आहे. मुख्यतः अर्थ, सहकार आणि ग्रामविकास या तीन खात्यावरून वाद असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : शिंदे सरकारचा तिसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार २ जुलै रोजी संपन्न झाला. राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी शपथ घेतल्यामुळे शिंदे गटासमोर अडचण निर्माण झाली आहे. मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले भरत गोगावले यांनी आम्हाला मिळणाऱ्या भाकरीचाही वाटा कमी झाला आहे. ज्यांना एक भाकर मिळणार होती त्यांना अर्धी भाकर मिळेल, ज्यांना अर्धी भाकर मिळणार होती त्यांना पाव भाकरी मिळेल असे सांगत नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दहा दिवस झाले तरी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आलेले नाही. नवीन मंत्र्यांना कोणती खाती द्यायची याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठकांवर बैठक झाल्या. मात्र, खातेवाटपाचा तिढा अदयाप सुटलेला नाही.
गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जवळपास तासभर चर्चा केली. त्यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणते खाते द्यावे आणि काही अकार्यक्षम मंत्र्यांना वगळावे याचा विचारविनिमय झाला. त्यानंतर मागील तीन रात्री खातेवाटपावर चर्चा होत होती.
अजित पवार यांना हवे अर्थखाते
महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले अजित पवार यांच्यावर आरोप करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेतली. मात्र, तेच अजित पवार आता शिंदे सरकारमध्येही पुन्हा अर्थ खात्यासाठी आग्रही आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह आणि अर्थमंत्री पद सोडण्यास तयार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली.
सहकार खात्यावरही लक्ष
राष्ट्रवादी पक्षाचा सहकारावर अधिक भर आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी सत्तेत आली त्या त्या वेळी राष्ट्रवादीने सहकार खाते हे आपल्याच ताब्यात ठेवले होते. सध्या भाजपचे अतुल सावे या खात्याचे मंत्री आहेत. शिंद भाजप सरकारमधील मंत्र्यावर अकार्यक्षम असा ठपका ठेवण्या आला आहे. त्यात अतुल सावे पहिल्या नंबरवर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील सहकार खातेकडून ते राष्ट्रवादीला देण्यात यावे अशी मागणी अजित पवार यांनी बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ग्रामविकासवर भर
ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेशी आणलं जोडली जाते हे इतकी वर्ष सत्तेत असलेल्या अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी ग्रामविकास खात्यावर अधिक लक्ष दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे हे खाते आहे. त्यामुळे त्यांच्याकडील हे खाते काढून घेण्यास फडणवीस तयार नाहीत.
अर्थ सहकार आणि ग्रामविकास ही तीन खाती हवीत असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे. तसेच, अकार्यक्षम मंत्री वगळून नवा फेरबदल करण्यात येणार आहे. त्यामुळे हा फेरबदल होण्यापूर्वीच आपल्या मंत्र्यांना खातेवाटप व्हावे असा आग्रह अजित पवार यांनी धरला आहे. परंतु, खातेवाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळेच अखेर हा प्रश्न दिल्ली हायकमांडच्या कोर्टात नेण्यात आल्याचे या सूत्रांनी सांगितले.