अबू आझमी एवढे का संतापले? एका ट्विटमुळे मविआत मोठी फूट, काय आहे नेमकं प्रकरण
राज्यात मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर आजपासून सुरू झालेल्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशीच महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. समाजवादी पार्टीने मविआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सपाचे आमदार अबू आझमी यांनी घोषणा केली आहे. त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर गंभीर आरोप देखील केले आहेत. अबू आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की आमचं हिंदुत्व कायम असेल, त्यांनी सर्वांना सोबत घेउन चालण्याची भूमिका मांडली नाही, त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादीनं ठरवायचं आहे की, त्यांच्यासोबत राहायचं की नाही राहयचं असंही यावेळी आझमी यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी सहा डिसेंबरला बाबरी मशिदीसंदर्भात एक ट्विट केलं होतं, त्या ट्विटनंतर आता हा वाद आणखी चिघळला आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 5, 2024
नेमकं काय म्हणाले आझमी?
महाविकास आघाडी सेक्युलर होती, हिंदू, मुस्लिमांमध्ये कुठलाच फरक केला जात नव्हता. मात्र निवडणूक होताच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट मत मांडलं की आम्ही हिंदुत्वाच्या भुमिकेवर ठाम आहोत. आपल्या लोकांनी हिंदुत्व घेऊन चलावं. राजकारणात धर्म आणणं ही चुकीची गोष्ट आहे. सहा डिसेंबरला आम्ही काळा दिवस म्हणून साजरा करतो. बाबरी मशिद त्या दिवशी तोडण्यात आली. उद्धव ठाकरे म्हणतात की ज्या शिवसैनिकांनी हे केलं त्यांचं आम्ही स्वागत करतो. असे वक्तव्य करणारे उद्धव ठाकरे जर सोबत असतील तर अशा आघाडीमध्ये समाजीवादी पार्टी राहाणं शक्यत नाही, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.
ते पुढे बोलताना म्हणाले की, नाना पटोले आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. महाविकास आघाडी सेक्युलर आहे की सांप्रदायिक हे स्पष्ट करायला पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊद्यात पण आमचा पक्ष सेक्युलर आहे, त्यामुळे तो सांप्रदायिक पक्षासोबत राहणार नाही. ज्यांनी अशाप्रकारचं वक्तव्य केलं त्यांच्यासोबत राहणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया अबू अझमी यांनी दिली आहे.