…म्हणून पत्नी सुनेत्रा मुंबईतून निघून आली : अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील विजय आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बारामतीकरांनी अजित पवारांच्या भव्य सत्काराचं आयोजन केलं.
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढण्यात आली. विधानसभा निवडणुकीतील विजय आणि उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर बारामतीकरांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar Sunetra Pawar) भव्य सत्काराचं आयोजन केलं. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी(Ajit Pawar Sunetra Pawar) सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं.
आजचा सत्कार हा आगळा वेगळा आहे. हा सत्कार माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. आजच्या मिरवणुकीमुळे खूप आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. माझे शाळेचे मित्र आज भेटले, असं अजित पवार म्हणाले. 16 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत येणार आहेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.
जनतेने जनतेचं काम केलं, आता आपलं काम
ज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, एवढं प्रेम दिलं त्या बारामतीकरांचा हा सत्कार आहे. मात्र आता काम करायचं आहे. गेल्या पाच वर्षात काम करता आले नाही. शहरासोबत जिल्ह्याची जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलं आहे. आता आपलं काम आहे. पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवायचा आहे, असं अजित पवार म्हणाले.
चार दिवस सासूचे असतात तसेच सुनेचेही चार दिवस येतात, विश्वासाला तडा जाऊ न देण्याचं काम आपल्याला करावे लागेल. दोन लाखांच्या पुढील कर्जदारांसाठी आम्ही काहीतरी करणार आहोत. बारामतीतील पोलीस कॉलनीतील घरं चांगली केली जाणार आहेत. 500 चौ. फूट जागा आता पोलिसांना देणार, असं अजित पवारांनी सांगितलं.
सुनेत्रा मुंबईतून निघून आली
यावेळी अजित पवारांनी बारामतीकरांना मुंबईला येऊ नका असा सल्ला दिला. जर मुंबईत होणारं कामं असेल तरच या. अन्यथा कोणीतरी येतो आणि म्हणतो सहजच आलो होतो, असं करु नका. मुंबईला येताना मुंबईची काम घेऊन या, सहज भेटायला येऊ नका. अजून सरकारी घर मिळालं नाही. मुंबईत छोटी घरं असतात, डायनिंग, किचन, बेडरूममध्ये लोकांना बसवावं लागतं. पत्नी सुनेत्रा तर मुंबईतून निघून आली, जोपर्यंत घर भेटत नाही तोपर्यंत येत नाही म्हटलं, असं अजित पवार म्हणताच, उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.