आज शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्वीकारणार?
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्गदर्शन करणार आहे.
मुंबई : एकीकडे सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू असतांना निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी धाव घेतली आहे. त्यात दुसरीकडे मुंबईत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला राज्य कार्यकरिणीतील नेते, आमदार, खासदार आणि इतर प्रमुख नेतेही उपस्थित असणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्गदर्शन करणार आहे.
मुंबई येथील एका नामांकित हॉटेलमध्ये ही राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. याचवेळी अनेक महत्वाच्या घोषणा देखील होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. यामध्ये संजय राऊत यांचे मुख्यनेते पदही काढून घेतले जाणार असल्याची माहिती आहे.
याशिवाय ज्या पक्षप्रमुख पदावरून उद्धव ठाकरे अडचणीत आले ते शिवसेना पक्षप्रमुख पदही एकनाथ शिंदे स्वीकारणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. सध्या मुख्यानेता म्हणून पक्षात एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिलाय त्यानंतर शिवसेना पक्षाची मालमत्ता आणि फंड यावर देखील एकनाथ शिंदे यांचा अधिकार असेल असं सांगण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय राज्यकार्यकारीणीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय अनेक महत्वाच्या जबाबदऱ्या इतर नेत्यांवर दिल्या जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि पक्ष दिल्यानंतर पुढील वाटचाल करण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
आगामी काळात पक्षवाढीच्या दृष्टीने आमदार आणि खासदार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहे. त्यामध्ये ठाकरे गटाला पुढील काळात सामोरे जातांना काय काळजी घ्यायची यावर देखील बोलण्याची शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी धाव घेतलेली असतांना दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे पक्षाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक आयोजित करत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या बाबतीत ठाकरे गटाने याचिका दाखल केल्याने त्यामध्ये काय युक्तिवाद होती, पक्ष आणि चिन्ह यावर स्थगिती मिळते का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दोन्ही घडामोडी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.