तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार करू; जयंत पाटील यांचं मोठं विधान
नगर, नाशिक, जळगाव, पुण्यासह सर्वच कांदा उत्पादक क्षेत्रात कांद्याचा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे मागच्या सहा महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीतरी आश्वासन देतील त्याला आज अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेली. काल कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी आश्वासन दिली. मात्र खर्च दुप्पट झाले, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
पुलाखालून बरेच पाहणी वाहून गेले आहे. नवीन चेहरे पुढे येत आहेत. तरुण मंडळी चांगलं काम करत आहे. तरुणांना संधी देण्यासाठी शरद पवार हे नेहमीच आग्रही असतात. पण एखाद्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तर परत येणाऱ्या आमदारांचा त्या मतदारसंघात विचार केला जाईल, असं मोठं विधान शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. जयंत पाटील यांनी अजितदादा गटात गेलेल्या आमदारांसाठी परतीचे दरवाजे उघडे केल्याने हे आमदार त्यांना प्रतिसाद देतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
जयंत पाटील हे नाशिकच्या येवल्यात आले होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं. महाराष्ट्रातील जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे. जनतेला देशातील संविधान वाचवायचे आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासलेली आहे. जीएसटी कराची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती कमी असताना गॅस, पेट्रोल, डिझेल महाग झाले आहे. त्यामुळे जनता वैतगाली असून जनतेला महाविकास आघाडी हा महत्त्वाचा पर्याय वाटत आहे. त्यामुळेच आमच्या 32 ते 35 जागा निवडून येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे.
प्रशासन काहीच करत नाही
लोकसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. लोकसभा निवडणुकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस पडतोय. शेवटच्या दोन-तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब केला जात आहे आणि निवडणूक आयोग डोळे बंद करून बसले आहे. तक्रार करूनही पोलीस प्रशासन कुठेही जात नाही अशा प्रकारचा अनुभव येतोय. कोणतीही कारवाई होत नसल्याची आमची प्रमुख तक्रार आहे. बीड, परळीमध्ये आमच्या उमेदवाराने रिपोलची मागणी केली आहे. मात्र बीडचे जिल्हा प्रशासन काहीच करताना दिसत नाहीये, असं पाटील म्हणाले.
आम्ही गोंधळ घालणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आज वनी येथे शरद पवारांची तर नाशिक येथे उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. सभेला जाऊ नये म्हणून प्रमुख कार्यकर्त्यांना अडकवले आहे. अश्या पद्धतीच्या कारवाईमुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालू आहे. आमचा कोणीही माणूस नरेंद्र मोदींच्या सभेला जाऊन गोंधळ घालणार नाही. आमच्या माणसांना प्रशासनाने मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली.