जळगाव : 1 ऑक्टोबर 2023 | आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील तीन मंत्री, तीन आमदार यांच्यासह विधानसभा अध्यक्ष यांना उतरविण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. यामध्ये जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांचेही नाव पुढे आले आहे. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे भाष्य केलंय. तर, दुसरीकडे त्यांनी आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीवरही टीका केलीय. राजकीय क्षेत्रातील, उद्योग क्षेत्रातील, बँकिंग क्षेत्रातील सर्वच क्षेत्रातील लोकांवर कारवाई सुरू आहे. यांच्यावर झाली, त्यांच्यावर झाली असे बोलून घेण्याचे काही कारण नाही. ज्यांनी चुकीचे कामे केले आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघ नखांवरून चुकीची टिप्पणी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या आस्थेचा विषय आहे. राजकारणासाठी अनेक विषय आहेत. आदित्य ठाकरे यांना नेमकी काय माहिती आहे त्याचे त्यांनी पुरावे द्यावे. उगाच काहीतरी टिप्पणी करू नये. राजकारण करायला तुम्हाला अनेक विषय आहेत असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांना या आदु बाळाचे खूप कौतुक आहे. या बाळ लाडामुळेच उद्धव ठाकरे यांच्यावर हे दिवस आले आहेत. बाळाला सांभाळता सांभाळता सगळे लोक गेले. हे आदु बाळच यामागचे कारण आहे. ४३ आमदार गेले, खासदार गेले. अजूनही लोक जात आहेत. तरी त्यांना अजूनही कौतुक असेल कौतक असेल तर आणखी करून घ्या म्हणजे उरले उरले सुरलेही जाईल असा टोला त्यांनी लगावला.
विजय वडेट्टीवार यांनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे मराठा आहे. त्यांनी ओबीसींचे सर्टिफिकेट घेतले आणि व्हॅलीलीडीटी मिळाली. पैसे घेऊन प्रमाणपत्र देण्याचं काम झपाट्यानं सुरू आहे असा आरोप केला. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी ज्यांच्याकडे पुरावे आहेत अशा अनेक लोकांकडे ओबीसीची सर्टिफिकेट आहेत. त्यामुळे वडेट्टीवार काय बोलत आहे याला काही अर्थ नाही. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे या दोघांमध्ये अंतर्गत स्पर्धा आहे त्यामुळे एकमेकांवर टीका करत आहेत असे सांगितले.
महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये एकमेकांवर अंतर्गत कुरघोडी करण्याची स्पर्धा लागली आहे. शिवसेना काँग्रेसवर टीका करते. काँग्रेस शिवसेनेवर टीका करते तर शिवसेना राष्ट्रवादीवर टीका करते असेच त्यांचे सुरू आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी ते सोडत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप पक्षाकडून काही आमदारांना लोकसभेचे उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यात माझेही नाव आहे अशी चर्चा मी माध्यमांमधून ऐकली आहे. पक्षात मात्र अशी कुठलीही चर्चा नाही, असे स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.