Nawab Malik | गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांची वर्ल्डकप जिंकण्याची भाषा, नवाब मलिकांचा भाजपला टोला
विरोधकांनी केलेल्या आरपोंना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचे वक्तव्य केले आहे. फर्जीवाड्याविरोधातील माझा लढा सुरुच राहील. आम्ही कायदेशीर लढाई लढू असंदेखील मलिक यांनी म्हटलंय.
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक भाजपने जिंकली. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय. भाजपच्या याच विजयाबद्दल बोलताना नवाब मलिक यांनी चांगलीच टोलेबाजी केलीय. गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, असं म्हणत मलिक यांनी नारायण राणे तसेच भाजपला खिजवलं आहे. तसेच विरोधकांनी केलेल्या आरपोंना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भ्रष्ट अधिकाऱ्य़ांना शिक्षा होणारच, कोर्टाची लढाई लढू
यापूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खंडणी तसेच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटे कागदपत्र दिल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. तसेच क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाला गोवण्यात आले आहे. यामागे भाजपचा हात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. यावेळी बोलताना “फर्जीवाड्याचा माझा लढा सुरु राहील. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. 18 कोटींची डील 50 लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे ? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे ? आम्ही कोर्टाची लढाई लढू. सत्य समोर येईल. भ्रष्ट अधिकाऱ्य़ांना शिक्षा होणारच आहे. शेवटपर्यंत माझा लढा सुरु राहील,” असे मलिक म्हणाले.
कितीही अब्रुनुकसानीचा दावा करुद्या, मी थांबणार नाही
तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला. “काही लोक बँका बुडवत आहेत. भाजपमध्ये गेल्यावर ईडी गप्प का बसत आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन हडप केली जात आहे. नवीन वर्षात नवे फर्जीवाडे समोर आणणार आहे. माझ्यावर कोणी कितीही अब्रुनुकसानीचा दावा करुद्या, मी थांबणार नाही. जे केल आहे त्याचा हिशोब द्यावा लागेल. पक्ष बघून आम्ही फर्जीवाडा बाहेर काढत नाही. ज्यांनी चुकीचे काम केले ते समोर येईल. त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. मंदिर तसेच मशिदीची जमीन लुटणारे नेते आणि अधिकारी आहेत, असेदेखील ते म्हणाले.
निवडणुक पुढे ढकलण्याचा डाव करु नका
देशातील कोरोना संकट तसेच महापालिका आणि देाशातील निवडणुकांवर बोलताना त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. “देशात कोविडच संकट आहे. पंतप्रधान नियम पाळा असे सांगतात. पण भाजपाचे नेते नियम पाळत नाहीत. तेच नियम तोडतात. निवडणुक पुढे ढकलण्याचा डाव करु नका. नियम पाळत निवडणुका होऊ शकतात,” असे मलिक म्हणाले.
इतर बातम्या :